ठळक मुद्देअवघ्या १७ शिक्षार्थ्यांपासून सुरू झाला संघ शिबिरांचा प्रवास
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यप्रणालीत दैनंदिन शाखा आणि प्रशिक्षण वर्गांचे मोठे महत्त्व आहे. स्वातंत्र्याअगोदरच्या काळापासून सुरू असलेला तृतीय वर्ष वर्ग यंदा देशाच्या उत्सुकतेचे केंद्र बनला आहे. काँग्रेसच्या मुशीतून घडलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे या वर्गाच्या समापनाला मुख्य अतिथी म्हणून येत आहेत. आतापर्यंत संघ शिक्षा वर्गांमधून लाखो स्वयंसेवक प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आहे. शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर स्वयंसेवकांना घडविणारा वर्ग अशी संघ परिवारात याची ओळख आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ९१ वर्षांअगोदर अवघ्या १७ शिक्षार्थ्यांपासून संघाच्या वर्गांची सुरुवात झाली होती आणि आजच्या तारखेत या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक गलेलठ्ठ पगारावर पाणी सोडण्यासदेखील मागेपुढे पाहत नसल्याचे चित्र आहे.संघात प्राथमिक, प्रथम, द्वितीय व तृतीय असे वर्ग दरवर्षी आयोजित करण्यात येतात. साधारणत: उन्हाळ्त सुट्यांच्या काळात हे वर्ग आयोजित होतात. संघाचा सर्वात पहिला वर्ग १९२७ साली मोहिते वाडा येथे आयोजित करण्यात आला होता. आद्य सरसंघचालक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या वर्गाला ‘ओटीसी’ (आॅफिसर्स ट्रेनिंग कॅम्प) या नावाने संबोधण्यात येत होते. सुरुवातीला हा वर्ग ४० दिवसांचा असायचा. या वर्गात सैन्य प्रशिक्षणदेखील देण्यात यायचे. सकाळी चार तास शारीरिक व दुपारी बौद्धिक उपक्रम व्हायचे. आश्चर्याची बाब म्हणजे रविवारी स्वयंसेवकांना सुटी रहायची. १९५० नंतर ‘ओटीसी’ला संघ शिक्षा वर्ग असे नाव पडले. भारतभर विविध प्रांतस्तरांवर प्राथमिक, प्रथम व द्वितीय वर्गांचे आयोजन होते. परंतु तृतीय वर्ष वर्गाचे आयोजन हे केवळ नागपूर येथील रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच होते. ४० दिवसांचा तृतीय वर्ष वर्ग ३० दिवसांचा झाला व २०१३ सालापासून याचा कालावधी २५ दिवसांचा झाला.प्रशिक्षणासाठी विशेष अभ्यासक्रमसंघ शिक्षा वर्गांसाठी विशेष अभ्यासक्रमदेखील तयार करण्याची परंपरा आहे. सुरुवातीच्या काळात शारीरिक उपक्रमांवर जास्त भर असायचा. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक जीवन, ग्रामविकास, कृषी, प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आता तर ‘सोशल मीडिया’ या विषयांबाबतदेखील प्रशिक्षण देण्यात येते. वयानुसार आणि विषयानुसार स्वयंसेवकांचे गण म्हणजेच गट पाडण्यात येतात. प्रत्येक गणात सर्व प्रदेशांच्या स्वयंसेवकांना सहभागी करण्याचा प्रयत्न असतोवेळापत्रकाचे तंतोतंत पालनसंघातर्फे स्वयंसेवकांसाठी वेळापत्रकच आखून देण्यात आले आहे. पहाटे ४.३० ते १० पर्यंत विविध उपक्रमांची दिवसानुसार रूपरेषा तयार असते. सकाळी ५ वाजता एकात्मता स्तोत्राने दिवसाच्या उपक्रमांना सुरुवात होते. त्यानंतर संघस्थानाला प्रारंभ होतो. हा शारीरिक प्रशिक्षणाचा भाग असतो. यात योगासन, दंडयुद्ध, पदविन्यास, नियुद्ध, खेळ अशा तासिका असतात. त्यानंतर २० मिनिटांची श्रमसाधना असते. यात प्रत्येक गणाला विविध कामे वाटून दिली असतात. स्नान आणि घोषवर्ग आटोपून मग योगनिद्रा आणि चर्चा घेण्यात येते. यात विविध विषयांवर चर्चा होते. दुपारच्या सत्रात सव्वातीन वाजता एकात्म मानवतावाद, धर्म, राष्ट्रीयता, स्वदेशी, आर्थिक चिंतन, शैक्षणिक चिंतन, राजकीय चिंतन, राष्ट्र-संकल्पना अशा विविध विषयांवर बौद्धिक होते. सायंकाळच्या वेळेस गणवेश चढवून सर्वजण संघस्थानावर येतात. यावेळी सायंकाळी ६ ते ७.४० या वेळेत आचारपद्धती, संचलन, रचना, समता यांचा अभ्यास असतो. रात्री भोजनानंतर स्वयंसेवक विविध कलांचे सादरीकरणदेखील करतात.