शफी पठाण नागपूर मायमाऊली मराठीचा महिमा सांगताना कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणायचे, ‘‘मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगती चालती दऱ्याखोऱ्यातील शिळा’’़ पण, पुढे जागतिकीकरणाचा अन् भाषिक ध्रुवीकरणाचा काळ अवतरला आणि दऱ्याखोऱ्यातील शिळांनाही लळा लावणारी आमची ही लाडकी भाषा आपल्याच घरात परकी होत गेली़ इतकी परकी झाली की ही राजभाषा अभिजात आहे असे आम्हाला जगास ओरडून सांगावे लागले़ बरं, या ओरडण्यात साऱ्याच मराठी जणांचा आवाज समाविष्ट झाला असता तर किमान संबंधितांच्या दरबारी तो लवकर पोहोचला तरी असता़ पण, मराठीचा प्रश्न हा भावनात्मक आणि सांस्कृतिक प्रश्न होता अन् या दोन्ही गोष्टींनी आज पोट भरत नाही़ त्यामुळे सर्वसामान्य मराठीजनांसोबतच मराठी भाषेविषयी सदासर्वकाळ उत्सवी जनजागरण करणारे महाभागही अपेक्षित ताकदीने पुढे आले नाहीत़ पण, म्हणून काही मराठीचे श्रेष्ठत्व कमी झाले नाही़ शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या या भाषेची दखल साहित्य अकादमीला घ्यावी लागली अन् मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला़ त्याचा आनंदोत्सव समग्र महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठीजनांमध्ये अद्यापही साजरा होतोय़ पण, हा आनंदोत्सव साजरा करतानाच जी भाषा आज शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार? आणि जी भाषा ज्ञानभाषा नाही ती भाषा भाषिक ध्रुवीकरणाच्या काळात सुरक्षित तरी कशी राहणार याचाही गंभीरतेने विचार करणे गरजेचे आहे़ वाचताना शब्द जहाल वाटतील पण हे खरे आहे़ मराठीची अखंडता आणि तिचा गर्भरेशमी गोडवा टिकून राहायचा असेल तर वाचन संस्कृती वाढली पाहिजे. पण, आजच्या पिढीचं काम बघायचं आणि ऐकायचं एवढय़ापुरतंच उरलेलं आहे. ज्ञानाला वृद्धिंगत करण्यासाठी वाचायचंही असतं याचं भान या वर्गाला दिसत नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या लेखकांपासून साऱ्यांनी मातृभाषा ही चिंतनाची भाषा आहे, असे सांगितले होते. पण, आज चिंतनासाठी वेळ कुणाला आहे? प्रत्येकाला पद आणि प्रतिष्ठा हवी आहे अन् त्यासाठी आज इंग्रजी हाच एकमेव पर्याय आहे़इंग्रजीविषयी आपल्या समाजात आधी वासाहतिक द्वेषाची भावना होती तरीही आपण तिला शरण गेलो. कारण अगदी स्पष्ट आहे आपले पहिले प्रेम तिच्या वापरामुळे मिळणाऱ्या पैशांवर व त्यातून मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेवर आहे. उद्या अशी व्यावसायिक संधी पुरवण्याच्या बाबतीत इंग्रजीची जागा दुसऱ्या एखाद्या भाषेने घेतल्यास आपण तिचा स्वीकार करू़ याचा अर्थ भाषा, तिचा जाज्वल्य इतिहास आणि तिची महानता या सर्व गोष्टी व्यावसायिक दृष्टीने निरर्थक आहेत़ आजच्या मराठी पिढीमध्ये मातृभाषेपेक्षा इंग्रजीचे प्रेम अधिक आहे. त्यातून दुभंगलेल्या विचारांची पिढी निर्माण होण्याची भीती आहे.काही इंग्रजी शब्दांना त्या अर्थाचा मराठीत पर्यायच नसतो. म्हणून बोलण्यात इंग्रजी शब्द येतात. पण अनेकदा आपण मॉडर्न आहोत हे दाखवायला परीक्षेची एक्झाम आणि मित्रांचे फ्रेंड्स होतात. त्यामुळे आपल्याकडे एकाही भाषेत अस्खलित बोलण्याचं कौशल्य उरत नाही, हा मुद्दा कुणी कसा नाकारू शकेल़ मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे हे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते. १९६० साली महाराष्ट्र जन्माला आले़ मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला मोठीच संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले अन् आताही तेच सुरू आहे़ मराठी भाषेला काहीही झालेले नाही आणि भविष्यात काही होणार नाही असा एक भ्रम मराठी भाषा दिनाला हमखास पसरवला जातो, तो अधिक धोकादायक आहे. प्रत्यक्षात स्थिती काय आहे? मराठी शाळा बंद पडताहेत. ज्या चालू आहेत त्यांची मराठीकडून सेमी-इंग्रजीकडे आणि कालांतराने पूर्ण इंग्रजी माध्यमाकडे वाटचाल सुरू आहे. मराठी माध्यमाच्या महाविद्यालयांना शरणाथीर्साठी बनवलेल्या छावण्यांची अवकळा आली आहे, याचाही विचार आजच्या दिवशी मराठीच्या उत्कर्षासाठी होणाऱ्या कार्यक्रमांच्या विचारपीठावरून कुणी करणार आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे़
अभिजात भाषेचा दर्जा मिळाला...पुढे काय?
By admin | Published: February 27, 2015 2:10 AM