नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरुवात झाली. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन हे प्रामुख्याने उपस्थित आहेत.
आपल्या भाषणादरम्यान शंकर महादेवन यांनी संघ, राष्ट्र व संगीतावर भाष्य केले. काही अनुभव हे आयुष्याला दिशा दाखविणारे असतात. संघाची देशाप्रति असलेली निष्ठा व काम हे प्रेरणादायी आहे. अखंड भारताचा विचार, संस्कृतीचे संवर्धन करण्यात संघाचे मौलिक योगदान आहे. आपल्या वैभवशाली देशात संगीताचा मोठा ठेवा आहे. आपल्या संस्कृतीने जगाला विश्वशांतीचा मंत्र दिला आहे. वर्तमान व भविष्यातील पिढ्यांपर्यंत याचे महत्त्व पोहोचविले पाहिजे. भारतीय नागरिकांनी देशाच्या परंपरेला आपल्या कामातून सम्मान दिला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत पुढील पिढ्यांसमोर आदर्श प्रस्थापित करण्यावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले.
जेव्हा गाणे बनवतो तेव्हा पुढील पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत कसे जाईल याचा प्रयत्न असतो. जेव्हा संधी मिळेल तेव्हा असा पुढाकार सर्वांनीच घेतला पाहिजे. आपल्या सर्वांचे हे कर्तव्यच आहे. संघाचे घोषपथक हेच काम करत असल्याचे दिसून येते. ११ वर्षांअगोदर मी माझी एकेडमी सुरू केली होती आणि ९० हून अधिक देशांत शास्त्रीय संगीत शिकवतो आहे. आपल्या संगीताचा गर्व बाळगला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या गीतात सरगम प्राण ओतते, त्याचप्रमाणे देशात कुठलीही समस्या असते तेव्हा स्वयंसेवक त्याच्या मागे ती सोडविण्यासाठी उभे राहून काम करतात. भारताला आता संपूर्ण जग आदराच्या नजरेने पाहत आहे, असे गौरवोद्गार शंकर महादेवन यांनी काढले.