राजेश पाणूरकर - नागपूरकर्नाटकी आणि उत्तर भारतीय गायिकांसह बासरीवादनाचा एक नवाच प्रयोग सुप्रसिद्ध बासरीवादक पं. रोणु मुजूमदार यांनी प्रचलित केला आहे आणि त्याला रसिकांची पसंतीही मिळते आहे. पण या दोन्हीही शैलीचे वादन आणि गायन यात फरक आहे. या दोन भारतीय संगीत शैलींचे एकत्रित सादरीकरण करण्याची संकल्पना कशी सुचली आणि या प्रयोगाचे प्रयोजन काय? असा प्रश्न केला असता पं. रोणु मुजूमदार म्हणाले, मुळात कर्नाटकी शैलीतले संगीतही समृद्ध आहे. पण या दोन शैलींमध्ये काही प्रमाणात भिन्नता असल्याने हिंदुस्तानी संगीताचे रसिक कर्नाटकी आणि कर्नाटकी संगीताचे लोक हिंदुस्तानी फारसे ऐकत नाही. या दोन्ही भारतीय शैलींनी मात्र आपले संगीत समृद्ध केले आहे. या शैलींच्या एकत्रीकरणातून एक नवा आनंद रसिकांना मिळावा म्हणून हा प्रयोग केला आणि यशस्वी केला. दोन्ही शैलींमध्ये अनेक राग सारखेच आहेत. यात झिंझोटी, जयजयवंती, हंसध्वनी यासारखे राग दोन्ही संगीत शैलींमध्ये आहेत आणि त्यांच्या वादनाच्या, गायनाच्या पद्धती शास्त्र नियमांतच पण वेगळ्या आहे. या दोहोंचे सौंदर्य एकाचवेळी रसिकांना मिळाले तर रसिकही त्याला स्वीकारतील, असे वाटले. त्यामुळेच हा प्रयोग करून पाहिला आणि रसिकांना तो आवडतो आहे. काही वर्षांपूर्वी गायन आणि बासरी असा प्रयोग आरती अंकलीकर यांच्यासह केला. त्यानंतर रसिकांनीच कर्नाटकी आणि हिंदुस्तानी शैलींचा मिलाप असलेला कार्यक्रम सादर करावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. यात हिंदुस्तानी संगीताच्या रागाला कर्नाटकी शैलीत पर्याय असलेलेच राग निवडता येतात. कारण त्याशिवाय दोन्ही शैलींचे एकत्रीकरण शक्य नाही. विदेशातही हा प्रयोग लोकांनी उचलून धरला आहे. मुळात माझे गुरू पं. विजयराघव राव हे कर्नाटकी संगीतातले होते. त्यामुळे कर्नाटकी शैली मी शास्त्रशुद्ध शिकलो. शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीतावरही माझे प्रेम आहे. अखेर संगीत हे भावनांना अभिव्यक्त करण्याचे, आनंदी करण्याचे आणि समाधी मिळविण्याचे साधन आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याचा आनंद आपल्याला घेता येतो. ह्यमाचिसह्ण चित्रपटाच्या शेवटी दहशतवादी चंद्रचूडला तब्बू सायनाइडची गोळी देते, असा दर्दभरा प्रसंग होता. हा प्रसंग अधिक ठळक करण्याची जबाबदारी गुलजारसाहेबांनी मला दिली. त्यासाठी बासरीची धून वाजवायला सांगितली. तो संपूर्ण सीन समजावून देण्यासाठी आमची बैठकही झालेली होती. त्यामुळे गुलजारजींना काय अपेक्षित आहे, याचा अंदाज आला होता. तरीही तो काही मिनिटांचा सीन केवळ बासरीच्या सुरावटीवर तोलून धरायचा, या विचाराने मनात धाकधूक सुरू होती. गुलजारसाहेबांनी हे ओळखलं असावं. ते मला म्हणाले, ह्यआप बजाईए तो सही! ये सीन आप के बांसुरी के सामने पनाह मांगेगा!ह्ण, त्यांचा विश्वास पाहून मला वेगळाच हुरूप आला आणि मी छेडलेल्या मारवा रागाची ती सुरावट कायमची यादगार ठरली. अनेक चित्रपटांना संगीत देतानाही बरेच काही शिकता आले.मुळात कलावंतांचे सातत्याने आकलन सुरू असले पाहिजे. लोकांना काय आवडते आणि त्यांच्या अभिरुचीला कलावंत म्हणून कसे वळण लावता येईल, याचा सातत्याने प्रयत्न असला तर रसिकही घडतात. लोकांना काहीही दिलेले आवडत नाही. योग्य संगीताचे वादन केले आणि त्यात कलावंताला समाधान मिळाले तरच रसिकांनाही हे समाधान मिळते, असे पं. रोणु मुजूमदार म्हणाले. नागपूरचे रसिक जाणकार दर्दीनागपुरात कार्यक्रम करताना काय वाजवायचे याचा वेगळा विचार करावा लागतो. कारण येथले रसिक संगीताचे जाणकार आहेत. नागपुरात कार्यक्रम करताना समाधान वाटते. हे दर्दी रसिकांचे शहर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील रसिकता मी अनुभवली आहे. मुळात कलावंतांचे सादरीकरण चांगले झाले तर येथील लोक प्रशंसा करताना थकत नाही पण वादनात काही चुकले, मैफिल रंगली नाही तर मोकळेपणाने दोष देणारे रसिकही येथे आहेत. नागपूरकरांनी अकारण कधीच कुणाला दोष दिला नाही. त्यामुळे नागपुरात वादन केल्यावर रसिकांची प्रतिक्रिया समजून घ्यायला आपण उत्सुक असतो, असे पं. रोणु मुजूमदार यांनी सांगितले. ते डॉ. वसंतराव देशपांडे संगीत समारोहासाठी नागपुरात आले होते.
अभिजात संगीतच रसिकांना आवडते
By admin | Published: August 01, 2014 1:15 AM