आनंद शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चादरची खोळ अस्वच्छ आहे, टॉवेल मळकट आहे अशी तक्रार नेहमीच एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी करीत असतात. प्रवाशांच्या या तक्रारी लवकरच संपणार असल्याचे संकेत असून अजनीत ५७ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणाऱ्या मेकॅनाईज्ड लाँड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केला आहे.अजनी रेल्वे परिसरातील स्टेडियमच्या मागील १५०० चौरस मीटर जागेवर मेकॅनाईज्ड लॉंड्रीच्या प्रकल्पाचे काम ४ जानेवारी २०१८ पासून सुरु असून ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. धुलाईशी संबंधित ८ टन क्षमतेच्या इम्पोर्टेड मशीन मागविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती आहे. यामुळे आगामी तीन महिन्यात नोव्हेंबरपर्यंत सिव्हील वर्क आणि मशीनची स्थापना करण्याचे काम पूर्ण होऊन लॉंड्रीमध्ये काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११-१२ च्या अर्थसंकल्पात नागपूर, भोपाळ, चंदीगडमध्ये मेकॅनाईज्ड लॉंड्री युनिट लावण्याची घोषणा केली होती. ‘बिल्ड ओन आॅपरेट अँड ट्रान्सफर’ (बुट) मॉडेल अंतर्गत ठेकेदार हैदराबादच्या सुप्रीम लॉंड्रीच्या लॉंड्री युनिटला १० वर्षांसाठी याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानंतर हे युनिट रेल्वेला हस्तांतरित करण्यात येईल. या युनिटमध्ये वॉशिंग मशीनच्या धर्तीवर मोठ्या मशीन लावण्यात येतील. यात चादर, टॉवेल, खोळ धुण्यात येतील. त्यानंतर त्यांना मशीनमध्ये पिळण्यात येऊन ड्रायरमध्ये सुकविण्यात येईल. धुण्यात आलेल्या चादर, टॉवेल सुरुवातीला नागपूर विभागातील रेल्वेगाड्यात उपलब्ध करून मुख्यालयाच्या परवानगीनंतर इतर गाड्यात उपलब्ध करून देण्यात येतील.अजनीत मेकॅनाईज्ड लॉंड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतर नागपूर विभागातील रेल्वेगाड्यात चादर, टॉवेलचा पुरवठा करण्यात येईल. मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर इतर गाड्यात या वस्तुंचा पुरवठा करण्यात येईल.’-सोमेश कुमार, ‘डीआरएम’ मध्य रेल्वे,नागपूर विभाग
नागपूर रेल्वे स्थानकावर ‘एसी’तील प्रवाशांना मिळेल स्वच्छ टॉवेल व चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:40 AM
चादरची खोळ अस्वच्छ आहे अशी तक्रार नेहमीच एसी कोचने प्रवास करणारे प्रवासी करीत असतात. या तक्रारी लवकरच संपणार असून अजनीत तयार करण्यात येणाऱ्या मेकॅनाईज्ड लाँड्रीचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केला आहे.
ठळक मुद्देनोव्हेंबरपासून अजनीत साकारणार मेकॅनाईज्ड लॉन्ड्री