लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहरातील मटन मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या घाणीवर कुत्री व डुकरांचा वावर असल्याने ती सर्वत्र पसरत असून, त्याची दुर्गंधीही सुटली आहे. ही घाण नागरिकांच्या आराेग्याला हानीकारक असल्याने त्या घाणीची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नगरसेवक काशिनाथ प्रधान यांच्यासह नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या परिसरात घन कचऱ्यासाेबतच बाेकडांच्या मांसाचे तुकडे शरीराचे अवशेष पडलेले आहेत. त्याची दुर्गंधी सुटली असून, या भागात कुत्री व डुकरांचा वावर वाढला आहे. या प्राण्यांमुळे येथील घाण परिसरात पसरते. या घाण व दुर्गंधीचा परिसरात राहणाऱ्या नागरिकांसह दुकानदार व ग्राहकांना त्रास हाेताे. साेबतच शहरातील शुक्रवारी बाजार, लाकडी टाल, बिजपुरीया हाऊस, ढबाले यांच्या घरामागील सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागताे.
स्थानिक नगरपालिका प्रशासन शहराच्या साफसफाईची कामे कंत्राटी पद्धतीने करीत असून, कंत्राटदार या कामात अनियमितता करीत असल्याचा तसेच रकमेची नियमित उचल करीत असल्याचा आराेप काशिनाथ प्रधान यांनी या निवेदनात केला आहे. शहरातील नागरिकांचे आराेग्य लक्षात घेता तसेच पावसाळ्यात ही समस्या गंभीर रूप धारण करणार असल्याने शहराची तातडीने साफसफाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे. शिष्टमंडळात नगरसेवक काशिनाथ प्रधान, नीरज लाेणारे यांच्यासह नागरिकांचा समावेश हाेता.