नागपूर : शहराच्या हृदयस्थळी असलेल्या गांधीसागर तलावाची व परिसराची स्वच्छता करा आणि यावर चार आठवड्यात अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिकेच्या धंतोली झोनचे सहायक आयुक्त किरण बागडे यांना दिले.
यासंदर्भात अॅड. पवन ढिमोले व अॅड. सारंग निघोट यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय नितीन जामदार व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गांधीसागर तलाव व परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिसरात कचरा फेकणाऱ्यांवर कुणाचेच नियंत्रण नाही. तसेच, तलावात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचला आहे. तलाव अंतर्बाह्य स्वच्छ करणे आवश्यक आहे. तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची अनेक वर्षे जुनी मागणी आहे. परंतु, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. योग्य देखभाल होत नसल्यामुळे तलावाची दुरवस्था झाली आहे. याशिवाय तलावाशेजारील रामन विज्ञान केंद्र व टाटा पारशी शाळेपुढे खासगी प्रवासी वाहने अवैधपणे पार्क केली जातात. पोलीस त्यांच्यावर नियमित कारवाई करीत नाहीत. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या गर्दीमुळे अपघात होतात. या परिसरात शाळेच्या विद्यार्थ्यांची नेहमीच रेलचेल असते. परिणामी, अवैध पार्किंगवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. दर्शन सिरास यांनी बाजू मांडली.
-----------
तलावात १३ वर्षांत ५६४ आत्महत्या
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी-२००५ ते फेब्रुवारी-२०१८ या काळात गांधीसागर तलावामध्ये तब्बल ५६४ व्यक्तींनी आत्महत्या केल्या. आतापर्यंत ही संख्या हजारापर्यंत पोहचली असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तलाव सुसाईड पॉईन्ट झाला आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे पीडित व्यक्ती सहज तलावापर्यंत पोहचते व पाण्यामध्ये उडी घेऊन जीवन संपवते. या तलावातील आत्महत्यांवर तातडीने आळा बसवणे आवश्यक आहे. त्याकरिता तलावाच्या चारही बाजूने संरक्षण भिंत बांधल्या गेली पाहिजे. तसेच, तलाव परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी खासगी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
------------------
'लोकमत'ने वेधले होते लक्ष
काही दिवसांपूर्वी 'लोकमत'नेही गांधीसागर तलावाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले होते. हा तलाव अतिक्रमणांच्या विळख्यात सापडलाय, परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेत, तलावाच्या सभोवताल लावलेल्या लोखंडी ग्रील तुटल्या, तलावातील पाणी दूषित झाले इत्यादी समस्या संबंधित वृत्तात नमूद करण्यात आल्या होत्या. परंतु, निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही. परिस्थितीत बदल झाला नाही.