नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्वच्छतेच्या बाबतीत देशभरात नागपूरने २० वा क्रमांक पटकावला आहे. तसेच उदयोन्मुख शहराच्या यादीत देशभरातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच पश्चिम मध्य क्षेत्राचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नागपूर शहराला मिळाला आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्या हस्ते या पुरस्काराचे सोमवारी वितरण झाले. महापौर प्रवीण दटके, आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, अपर आयुक्त नयना गुंडे व आरोग्य अधिकारी प्रदीप दासरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. केंद्र सरकारने १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांत स्वच्छता मोहीम राबविली होती. या सर्व शहरांचे सर्वेक्षण सरकारकडून करण्यात आले होते. त्या आधारावर केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी सोमवारी देशभरातील ७३ स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली. यात नागपूर २० व्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पिंपरी-चिंचवड पहिल्या तर बृहन्मुंबई महापालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या १० शहरात नागपूरचा समावेश नाही. परंतु गेल्या वेळी स्वच्छतेच्या बाबतीत २५६ वा क्रमांक होता. यावेळी नागपूर शहराने यावेळी चांगली प्रगती करीत २० वे स्थान मिळविले आहे. सांडपाणी प्रक्रिया, शहरातील कचरा उचलणे व त्याची विल्हेवाट लावणे तसेच महिलांसाठी बाजार वा वर्दळीच्या ठिकाणी शौचालये, सार्वजनिक शौचालय यात नागपूर महापालिका कमी पडली. यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न केले असते तर पहिल्या १० शहरात नागपूरचा समावेश झाला असता. याला आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दुजोरा दिला. पश्चिम मध्य क्षेत्रात प्रथमस्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कार्य केल्याने नागपूर शहराला पश्चिम मध्य क्षेत्रात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. शनिवारी दिल्ली येथे अपर आयुक्त नयना गुंडे ,आरोग्य समितीचे सभापती देवेंद्र मेहर, आरोग्य अधिकारी प्रदीप दासरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
स्वच्छ नागपूर, सुंदर नागपूर
By admin | Published: February 16, 2016 3:52 AM