लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडून उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा केला जातो. स्वच्छ शहराच्या यादीत नागपूर १३७ व्या क्रमांकावर आले होते. यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्याने स्वच्छ शहराच्या यादीत पहिल्या २० शहरात नागपूरचा समावेश होईल, असा दावा केला जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी सोमवारी केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाचे पथक तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले आहे. केंद्रीय पथक पाहणी करणार असल्याने शहरातील मुख्य रस्ते व चौकात सफाई करून बॅनर लावण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहरातील ‘लोकमत चमू’ने शहरातील स्वच्छतेचा आढावा घेतला असता विविध भागात कचऱ्याचे ढिगारे साचल्याचे आढळून आले. एवढेच नव्हे तर शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या तलावातील पाण्यावर कचऱ्याचे ढिगारे असल्याचे धक्कादायक चित्र बघायला मिळाले.
‘उपद्रव शोधपथका’चे हात बांधलेसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी माजी सैनिकांचा समावेश असलेले उपद्रव शोधपथक गठित करण्यात आले आहे. परंतु पथकाच्या कामकाजात नगरसेवक हस्तक्षेप करतात. त्यामुळे पथकातील जवानांना कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करताना मर्यादा आहेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, अस्वच्छता निर्माण करणे व अतिक्रमण करणे, व्यावसायिक व ठेलेवाल्यांनी परिसर अस्वच्छ केल्यास संबंधितांना दंड करण्याचे अधिकार नागरी पोलिसांना दिले आहे. परंतु कारवाई करता येत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली.
घाटावरही घाणवर्दळीच्या गंगाबाई घाट रोडलगत कचऱ्याचा ढीग साचला आहे. ये-जा करणाऱ्यांना हा कचरा दिसतो पण महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना तो दिसत नाही. तक्रार केल्यानंतरही महापालिकेचे कर्मचारी दखल घेत नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.