केंद्राचे पथक सर्व्हेसाठी कोणत्याही क्षणी नागपुरात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ हे केंद्रीय गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालयाकडून घेतलेल्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणाचे सहावे वर्ष आहे. याअंतर्गत देशातील शहरांचे सर्वेक्षण सुरू आहे. नागपूर शहरात कोणत्याही क्षणी केंद्राचे पथक सर्वेक्षणासाठी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनपाचा आरोग्य (स्वच्छता) विभाग अलर्ट मोडवर आहे. झोनच्या सहायक आयुक्तांना शहरातील सार्वजनिक शौचालय, रस्ते व सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये नागपूर शहराचा १८ क्रमांक आला होता. यात सुधारणा व्हावी, पहिल्या १० शहरांच्या यादीत क्रमांक यावा, यादृष्टीने आरोग्य (स्वच्छता) विभाग मागील काही दिवसापासून तयारीला लागला आहे. प्रभागात स्वच्छता रॅलीचे आयोजन, जनजागृती कार्यक्रम, रस्ते व वस्त्यात साफसफाई करून स्वच्छता ठेवणे असे उपक्रम राबविले जात आहेत.
पंचतारांकित रेटिंगसाठी हागणदारीमुक्त शहर, किती सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृह उपलब्ध आहेत, व्यावसायिक भागात किती वेळ सार्वजनिक ठिकाणी साफसफाई केली जाते. घनकचऱ्यावर प्रक्रिया, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित केला जातो का, अशा मुद्यांचा समावेश आवश्यक असतो. नागपूर हागणदारीमुक्त शहर म्हणून यापूर्वी जाहीर झाले आहे. मात्र स्वच्छतागृहांची स्वच्छता हा प्रश्न सुटलेला नाही. ओला व सुका कचरा पूर्णपणे वेगवेगळा संकलित केला जात नाही. देशातील स्वच्छ शहरांमध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहराला मागील वर्षी सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून जाहीर करण्यात आले होते.
....
झोन कार्यालयांना स्वच्छतेचे निर्देश
केंद्राचे पथक सर्व्हेसाठी कोणत्याही क्षणी नागपुरात येण्याची शक्यता विचारात घेता झोनचे सहायक आयुक्तांना झोन क्षेत्रात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून मनपाची तयारी सुरू आहे. स्वच्छता रॅली, जनजागृती, साफसफाई मोहीम राबविल्या जात आहे. सार्वजनिक शौचालयात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश सहायक आयुक्तांना देण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये नागपूरच्या क्रमांकात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
- डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त घनकचरा व्यवस्थापन मनपा