पाच हजार ट्रक गाळ काढणार : गडकरींच्या वाढदिवसाचे औचित्य, २१ ते २८ मे दरम्यान मोहीम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त पोस्टर, बॅनर यावर खर्च न करता गेल्या वर्षी भाजपाच्या दक्षिण-पश्चिम नागपूरतर्फे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावर्षी २१ ते २८ मे या कालावधीत लोकसहभागातून सोनेगाव तलावाची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मागील काही वर्षापासून उन्हाळ्याच्या दिवसात सोनेगाव तलाव कोरडा पडतो. त्यामुळे तलावाला मैदानाचे स्वरुप आले आहे. यापूर्वी अनेकदा सफाई करण्यात आली. परंतु याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तलावातून ५ हजार ट्रक गाळ काढण्यात येणार आहे. यासाठी ७ पोकलॅन्ड, ४ जेसीबी व ४० टिप्परचा वापर केला जाणार आहे. तसेच तलावाच्या सभोवताल वृक्षारोपण, बंडींग करण्यात येणार आहे. या अभियानात १५ हजार नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती जोशी यांनी दिली. गेल्या वर्षी महाआरोग्य शिबिराचा ३० हजार नागरिकांनी लाभ घेतला होता. यावेळी सोनेगाव तलाव स्वच्छ व सूंदर करण्याचा निर्णय घेतला आहे. यात भाजपा कार्यकर्त्यासोबतच स्थानिक नागरिक, सेवाभावी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच भूगर्भ तज्ज्ञांची यासाठी मदत घेऊन तलाव कोरडा पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येईल. अभियान यशस्वी व्हावे, यासाठी १७ ते २० मे या कलावधीत भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन जनजागृती करणार आहेत. रेनवॉटर हार्वेस्टींगसाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल. सफाई अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, विकास महात्मे आदी उपस्थित राहणार आहेत. तलावातून काढण्यात येणारा गाळ शेतकरी व गरजूंना मोफत दिला जाईल. तसेच लंडन स्ट्रीट मधील खोलगट भाग, मैदानात हा गाळ टाकला जाईल. अशी माहिती जोशी यांनी दिली. पत्रकार परिषदेला भाजपा दक्षिण- पश्चिम नागपूरचे अध्यक्ष रमेश भंडारी, सभापती प्रकाश भोयर, पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, आशिष पाठक आदी उपस्थित होते.
सोनेगाव तलावाची करणार सफाई
By admin | Published: May 18, 2017 2:35 AM