पालकमंत्र्यांच्या हस्ते नदी स्वच्छता अभियानाचा प्रारंभ : नागरिक, सामाजिक संस्था, संघटनांनी सहकार्य करावेनागपूर : नद्या आणि पाण्याचे स्रोत स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. महापालिकेने नदी स्वच्छता अभियानाचे लोकोपयोगी कार्य सुरू केले आहे. पावसाळ्यापूर्वी पिवळी, नाग व पोहरा या तीनही नद्या स्वच्छ करण्यात येतील. या अभियानात नागरिक, सामाजिक संस्था व व्यापारी प्रतिष्ठाने आदींनी सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले.महापालिकेच्या नदी स्वच्छता अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे व महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते जरीपटका येथील नारा घाट जवळील पिवळी नदीच्या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. शहरातील नाग, पिवळी व पोहरा नदी तसेच नाले स्वच्छ करण्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याला प्रतिसाद देत स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. पिवळी नदीचे स्वच्छता अभियान महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास संयुक्तपणे राबवीत आहे. यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, माजी महापौर प्रवीण दटके, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, बसपा गटनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, मनोज सांगोळे, मुरलीधर मानवटकर, जितेंद्र घोडेस्वार, स्नेहा निकोसे, नसरिम बानो, वीरंका भिवगडे, मंगला लांजेवार, संगीता गिऱ्हे, अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, डॉ. आर.झेड. सिद्दीकी, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सतीश पासेबंद, कार्यकारी अभियंता मनोज इटकेलवार, मनपाचे अधीक्षक अभियंता दिलीप जामगडे व मनोज तालेवार, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, नदी व सरोवर प्रकल्पाचे मो. इजराईल आदी उपस्थित होते. तसेच संगम चाळ येथे नाग नदी तर सहकारनगर घाटाजवळील पोहरा नदी स्वच्छता अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. सर्व कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)नदी स्वच्छता अभियानात ‘लोकमत’चा पुढाकारशहराचा ऐतिहासिक वारसा असलेली नागनदी तसेच पिवळी व पोहरा नदी स्वच्छ व्हावी. सोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील नाले स्वच्छ व्हावे. यासाठी ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मानवी शृंखलेतही लोकमतच्या चमूने सहभाग घेतला होता. असे विविध उपक्रम राबवून ‘लोकमत’ने नदी स्वच्छता अभियानात पुढाकार घेतला आहे.
लोकसहभागातून नद्या स्वच्छतेचा संकल्प
By admin | Published: April 18, 2017 2:01 AM