नागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने गेल्या चार दिवसांपासून शहरातील अतिक्रमण कारवाई जोरात सुरू केली आहे. बुधवारी महापालिकेच्या तीन झोनमध्ये कारवाई करून ९२ अतिक्रमणे काढून ४ ट्रक साहित्य जप्त केले आहे.
हनुमाननगर झोनअंतर्गत तुकडोजी पुतळा ते क्रीडा चौक, रेशिमबाग चौक ते तिरंगा चौक, तुकडोजी पुतळा ते अजनी पोलिस स्टेशनपर्यंत अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील रोड व फूटपाथवर अवैध पद्धतीने लावण्यात आलेले ठेले व दुकाने हटविण्यात आली. या झोनमधून महापालिकेने ३६ अतिक्रमणे हटविली व १ ट्रक साहित्य जप्त केले.
नेहरूनगर झोनअंतर्गत नेहरूनगर ते भांडे प्लॉट चौक, दिघोरी चौक ते गुरुदेवनगर चौक, गजानननगर चौक ते सक्करदरा चौकपर्यंत अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. जवळपास २८ अतिक्रमणे हटविली व २ ट्रक साहित्य जप्त केले. मंगळवारी झोनमध्ये मंगळवारी बाजारात अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. येथून २८ अतिक्रमणे हटविली व १ ट्रक साहित्य जप्त केले. येथे अवैध पद्धतीने बांधण्यात आलेले ५०० चौरस फुटांचे टिनाचे शेड तोडण्यात आले.