लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामाच्या करारासंबंधाने ग्राम पंचायत सदस्याला एक हजाराची लाच मागणारा विजय बाजीराव मोरे (वय ५२) नामक जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. जिल्हा परिषदेच्या परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.मोरे लकडगंजमधील गरोबा मैदान परिसरात राहतो. तो जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात वरिष्ठ सहायक (लिपिक) आहे. शासकीय योजनेनुसार, नेरला ग्राम पंचायतला समाजभवन तसेच आखाडा (व्यायाम शाळा) बांधकाम मंजूर झाले. आमदार निधीतून हे काम पूर्ण केले जाणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत ग्राम पंचायतीला करारनामा करावा लागतो. त्यासाठी निवीदा (बी-१ फार्म) भरून द्यावा लागतो. करारनामा करण्यासाठी तक्रारकर्त्या ग्राम पंचायत सदस्यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधला होता. मोरेने या कामासाठी एक हजार रुपयांची लाच मागितली. लाच द्यायची तयारी नसल्यामुळे ग्राम पंचायत सदस्याने एसीबीकडे तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर मोरेला जेरबंद करण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी ग्राम पंचायत सदस्य एक हजार रुपये घेऊन जिल्हा परिषदेत मोरेकडे गेले. ही रक्कम स्वीकारताच साध्या वेशात बाजूलाच घुटमळणाऱ्या एसीबीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोरेच्या मुसक्या बांधल्या.त्याच्याविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, एसीबी आणि जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हाकेचे अंतर आहे. ते लक्षात घेता ही कारवाई करून घेण्यासाठी भंडाऱ्याचे एसीबी पथक बोलवून घेण्यात आले होते.कार्यालयीन कक्ष, घरीही झडतीमोरेला पकडल्यानंतर एसीबीच्या दुसऱ्या पथकाने त्याच्या कार्यालयातील कक्षात आणि घरी झाडाझडती घेतली. त्यात काय मिळाले ते स्पष्ट होऊ शकले नाही. एसीबीचे अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, शिपायी सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, शेखर देशकर, सुनील हुकरे आणि दिनेश धार्मिक यांनी ही कामगिरी बजावली.
लाचखोर लिपिकाच्या मुसक्या बांधल्या : जिल्हा परिषदेत खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 11:55 PM
विकास कामाच्या करारासंबंधाने ग्राम पंचायत सदस्याला एक हजाराची लाच मागणारा विजय बाजीराव मोरे (वय ५२) नामक जिल्हा परिषदेतील लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. जिल्हा परिषदेच्या परिसरात शुक्रवारी दुपारी झालेल्या या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.
ठळक मुद्देएसीबीची कारवाई