निशांत वानखेडे
नागपूर : गेल्या काही दिवसांत विदर्भासह दक्षिण भारतात कडूलिंबाची झाडे सुकत जाण्याच्या कारणामुळे वनस्पती शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. हवामान बदलाच्या कारणामुळे ‘ टि माॅस्किटाे बग ’ नामक कीटकाला अनुकूल वातावरण मिळाले असून, कडूलिंबासह काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरूला ही याचा फटका बसत असल्याचा निष्कर्ष संशाेधकांनी व्यक्त केला आहे.
नागपूरसह विदर्भात कडूलिंबाच्या झाडांवर राेगाचा प्रादुर्भाव हाेत असून, झाडे मरायला लागल्याचे वृत्त ‘लाेकमत’ ने प्रकाशित केले हाेते. ट्राॅपिकल फाॅरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे सेवानिवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. पी. बी. मेश्राम यांनी यावर प्रकाश टाकला. ‘ टि-माॅस्किटाे ’ हा मूळत: चहावर प्रादुर्भाव करणारा कीटक आहे. शिवाय काजू, माेहगनी, माेरिंगा, द्राक्ष, पेरू हेही या कीटकाचे ‘हाेस्ट ’ आहेत. सध्या या कीटकाने कडूलिंबाला लक्ष्य केले आहे.
हा उपाय प्रभावी
प्राेफेनफाॅस किंवा लॅमडा सायलाेथ्रील २० मिली. साेबत बाविस्टीन किंवा कार्बेनडॅझिन पावडर २० ग्रॅम यांचे १० लिटर पाण्यामध्ये मिश्रण करावे. हे मिश्रण आजारी झाडावर दूर राहून फवारणी करावे. उरलेले मिश्रण आरा तयार करून बुंध्याजवळ टाकावे. यामुळे टि माॅस्किटाे बग आणि बुरशीवर नियंत्रण मिळेल.
लाळेतील विषद्रव्यांमुळे वाळतात झाडे
टि-माॅस्किटाे हा कीटक झाडाची काेवळी पाने नाही तर शेंड्यामधून रस पितात. मात्र या प्रक्रियेत ते लाळेद्वारे विषारी द्रव्य साेडतात. त्यामुळे फांद्यांना जखम हाेते व त्यातून गाेंद निघताे. तेवढा भाग नंतर काळपट पडताे. त्यावर बुरशी तयार हाेते. या बुरशीमुळे मुळातील अन्नद्रव्य पाने, फांद्यांपर्यंत पाेहोचणे बाधित हाेते. त्यामुळे झाडे सुकतात व मृत हाेत असल्याचे डाॅ. मेश्राम यांनी स्पष्ट केले.