लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवसभराच्या नियमित हवामानानंतर सायंकाळनंतर विदर्भातील वातावरण बदलले. मध्य प्रदेशातील शिवणी भागाकडून नागपूर जिल्ह्यात आलेल्या वेगाच्या वाऱ्यासोबत पावसाचेही आगमन झाले. त्यामुळे सायंकाळी सावनेर शहरात या अवकाळी पावसाने सलामी दिली. या सोबतच अन्य भागातही रात्री पावसाचे आगमन झाले. यामुळे वातावरणाचा रंग पालटून गेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार सायंकाळी हलक्या पावसाचे आगमन नागपूर जिल्ह्यात झाले. नागपूर शहरातही सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास सौम्य वादळ आले. त्यानंतर रात्री ९ वाजता मेघ गर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. मध्य प्रदेशात पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. भाजीपाला, टमाटरची शेती गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाली. या वातावरणाची झळ लगतच्या नागपूर जिल्ह्यालाही काही वेळातच बसली. सावनेर शहरात रात्री ८.३० वाजता पावसाच्या हलक्या सरी आल्या. कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी शिवार, धापेवाडा शिवारातही पावसाचे आगमन झाले. कुही तालुक्यातील वेलतूर परिसरातही रात्री ९ वाजताच्या सुमारास पाऊस पडला.
बुधवारी पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गारपिटीचा आणि मेघगर्जनेसह पाऊस येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असून खळ्यावरील माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विजांपासून रक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
रात्री तापमान खालावले
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दिवसभर स्वच्छ उन्ह पडले होते. किमान तापमानाचा पाराही १५ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता. नागपूरसह वाशिम आणि गडचिरोलीमध्ये १७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अमरावती, यवतमाळ, बुलडाणामध्ये २० अंशाची तर अकोला, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात १८.५ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. गोंदियातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअस होते. सायंकाळनंतर मात्र या सर्व ठिकाणी तापमान बऱ्यापैकी कमी झाले.
...