निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य माणसांना लक्षात येत नसले तरी एकूणच हवामानात गंभीर स्वरूपाचे बदल घडून येत आहेत. काेणत्याही ऋतूमध्ये अचानक हाेणारा अवकाळी पाऊस, तापमानात भरमसाठ वाढ हे सर्व हवामान बदलाचे संकेत हाेत. हाेत असलेल्या या जलवायू परिवर्तनामुळे महाराष्ट्रातील शेतीवर गंभीर स्वरूपाचे संकट ओढवणार असून बदलती पर्जन्यवृष्टी व तापमान वाढीमुळे येत्या २०५० पर्यंत विविध भागातील प्रमुख पिकांच्या उत्पादनात २० ते ५० टक्के घट हाेणार असल्याचा शास्त्रीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
बारामती येथील भूगाेल विषयाचे प्राध्यापक डाॅ. राहुल ताेडमल यांनी केलेल्या हवामान बदलाच्या शास्त्रीय अभ्यासातून ही गंभीर शक्यता मांडली आहे. त्यांनी पुण्याच्या मेटरालाॅजी विभागाकडून प्राप्त हवामान अंदाजाच्या सांख्यिकी सामग्रीच्या सहायाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व काेकण भागातील परिस्थितीचा अभ्यास करून अमेरिकन संख्याशास्त्रीय विश्लेषणातून हा अंदाज मांडला आहे. स्विर्त्झलॅन्डमधील ‘प्युअर अँड अप्लाइड जीओफिजिक्स’ या मासिकात हा शाेध निबंध प्रकाशित झाला आहे.
यानुसार डाॅ. ताेडमल यांनी २०५० ते पुढचे ८५ वर्ष म्हणजे २१०० पर्यंतचे अंदाज मांडले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत तापमानात ०.५ ते २.५ अंशाची वाढ हाेइल आणि २०३३ नंतर ही वाढ प्रकर्षाने जाणवेल. विशेषत: मध्य महाराष्ट्र व काेकणात तापमान असह्य ठरेल. येणाऱ्या पाच दशकात वर्षाच्या सरासरी तापमानात ८० टक्के वाढ हाेइल. या तापमान वाढीमुळे प्रमुख पिकांपैकी विदर्भ व काेकणातील तांदूळ, विदर्भातील कापूस व संत्रा तसेच इतर भागातील ज्वारी, ऊस, कांदा, मका, कडधान्य यांच्या उत्पादन क्षमतेवर गंभीर परिणाम हाेतील.
पर्जन्यवृष्टीत धाेक्याचे संकेत
- २१०० पर्यंत विदर्भ व पश्चिम घाटात पाऊस ८२ ते २२५ मिमीने वाढेल.
- २०५० पर्जन्यमानात १८ ते २२ टक्के वाढ.
- ढगफुटीच्या रूपाने मागील वर्षी अनुभवलेली पूर स्थितीची पुनरावृत्ती राज्यभरात वारंवार पाहायला मिळेल.
--------------
पिके संवेदनशील जिल्हे (२०५० पर्यंत हाेणारी तापमान वाढ पिकांवरील परिणाम)
-ज्वारी : सातारा, पुणे, मावळ, उस्मानाबाद, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा १.१५ ते १.६ अंश उत्पादन क्षमतेत १८ टक्के घट
-ऊस : पुणे, साेलापूर, सांगली, काेल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, परभणी १.५ ते २.५ २२ टक्के घट
-तांदूळ : भंडारा, चंद्रपूर, रत्नागिरी, काेकण, रायगड, मावळ १.५ ते २.५ अंश ४९ टक्केपर्यंत घट
-कापूस : बुलडाणा, जालना, परभणी, नांदेड ०.९ ते १.५ अंश प्रतिहेक्टर २६८ किलाे घट
-बाजरी : सातारा, नंदूरबार, धुळे, वाशिम, पुणे, जालना, औरंगाबाद १.५ ते १.६ अंश ३४ अंशापेक्षा अधिक तापमानात बाजरीच्या उत्पादकतेत घट येईल.
नागपूरचे तापमान ०.७ ते २ अंशाने वाढले
नीरीच्या २०१८-१९ च्या अहवालानुसार नागपूरच्या तापमानात १८७० ते २०१८ या १४८ वर्षाच्या काळात तापमानात ०.७ अंशाने वाढ झाली आहे. दुसऱ्या एका अंदाजानुसार गेल्या २० वर्षात तापमानात २ अंशाने वाढ झाली आहे. नागपूर हे ‘अर्बन हिट आयलँड’ हाेणे त्याचाच परिणाम आहे. पर्जन्यमान व हिवाळ्याच्या पॅटर्नमध्येही माेठा बदल जाणवत आहे.