नागपूर : बुधवारी सकाळपासून वातावरणाने कूस बदलली. आकाशात ढगांची गर्दी जमली हाेती. त्यामुळे दिवसाचे तापमान १.५ अंशाने खाली घसरून २९.१ अंशावर पाेहचले. मात्र ढगांमुळे रात्रीचे तापमान ३.५ अंशाने वाढून १७ अंशावर पाेहचले. विदर्भात १३.६ अंशासह गाेंदिया सर्वात थंड ठरले.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशातून हाेत कर्नाटकपर्यंत सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्याचा प्रभाव पश्चिम मध्य प्रदेश व महाराष्ट्रावर पडला आहे. याशिवाय दक्षिण-पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. या कारणाने नागपूरसह मध्य भारतातील काही जिल्ह्यात आकाशात अचानक ढग जमा झाले. दरम्यान, ढग दाटले असले तरी पावसाची नाेंद कुठेही झाली नाही. येत्या २४ तासपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. यादरम्यान १३ फेब्रुवारीपर्यंत नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार हाेणार आहे. त्यामुळे पुन्हा पारा घसरण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.