नागपूर: वातावरणाचा वेगळा अनुभव वैदर्भीयांना येताे आहे. पावसाळी वातावरणामुळे काही जिल्ह्यात कमाल तापमानात माेठी घसरण झाली, तर किमान तापमानाने उसळी घेतली आहे. त्यामुळे दिवसा थंडीचा गारवा आहे पण रात्री उष्णता जाणवत आहे. हवामानाचा असा अनुभव नागरिकांच्या आराेग्यासाठी धाेकादायक ठरला असून सर्दी, खाेकला व इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
तीन दिवसांपासून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात आकाश ढगांनी व्यापले आहे. नागपुरात मंगळवारी सकाळी हलक्या पावसाचे थेंबही पडले. त्यामुळे कमाल तापमान खाली घसरत २५.६ अंशावर खाली आले, जे सरासरीपेक्षा ३.७ अंशाने कमी आहे. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर गारव्याची अनुभूती हाेत आहे. दिवसा तापमान घसरले असले तरी रात्रीचे तापमान २४ तासात ५ अंशाने उसळले. नागपूरला १९.४ अंश किमान तापमानाची नाेंद झाली असून जे सरासरीपेक्षा तब्बल ६.१ अंशाने अधिक आहे.
गाेंदिया शहरात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून मंगळवारी सकाळपर्यंत ९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. ही रिपरिप दिवसाही कायम हाेती व ५ मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे कमाल तापमानात ६.३ अंशाची घसरण झाली आहे. दिवसाचा पारा सरासरीच्या ८.३ अंशाने खाली आले असून २०.७ अंश तापमानाची नाेंद झाली. रात्रीचा पारा मात्र सरासरीच्या वर आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात रात्रीचा पारा वर चढला आहे. २४ जानेवारीपर्यंत हे तापमान कायम राहणार असून त्यानंतर आकाश निरभ्र हाेण्याचा अंदाज आहे.