सायबर विशेषज्ञांनी केले सतर्क : पोलिसांच्या कार्यपद्धत, साधनसुविधांचीही माहिती नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून पोलीस मुख्यालयात सुरू असलेल्या तंत्र टेक्नो एक्स्पो-२०१७ चा शुक्रवारी रात्री समारोप झाला. पोलिसांच्या कार्यपद्धत, साधनसुविधांची माहिती देतानाच सर्वसामान्यांना हिताचे ठरेल असे मार्गदर्शन करणारा हा एक्स्पो ठरला. शहर पोलिसांतर्फे काटोल रोडवरील पोलीस मुख्यालय परिसरात आयोजित ‘तंत्र टेक्नो एक्स्पो २०१७’चे बुधवारी सायंकाळी सायबर विशेषज्ञ शशिकांत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, क्रिकेटपटू फैज फजल आणि बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उद्घाटनाप्रसंगी सायबर विशेषज्ञ चौधरी यांनी महत्त्वपूर्ण माहिती देताना सांगितले की, घरबसल्या व्यक्तींच्या खासगी क्षणांनाही शेकडो किलोमीटर दूर असलेला व्यक्ती सहजतेने पाहू शकतो. बेडरूममध्ये लागलेल्या स्मार्ट टीव्हीचा यासाठी वापर केला जाऊ शकतो. स्मार्ट फोन, स्मार्ट टीव्ही लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. परंतु याचा उपयोग ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा नुकसान पोहचवण्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो. स्मार्ट टीव्हीमध्ये टीप लावून दुसऱ्या ठिकाणी बसलेला व्यक्ती आपल्या खासगी क्षणांना रेकॉर्ड करू शकतो. संबंधित व्यक्तीला याबाबत माहितही होणार नाही. या रेकॉर्डिंगच्या मदतीने व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळले जाऊ शकतात. त्यामुळे नेहमी सतर्कता बाळगण्याची गरजही त्यांनी विशद केली. समारोपाच्या कार्यक्रमाला कॅप्टन एम.एस. कोहली, जगातील सर्वात कमी उंचीची म्हणून गणल्या जाणाऱ्या ज्योती आमगे, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त दीपाली मासिरकर, ईशू सिंधू, अभिनाश कुमार, रवींद्रसिंग परदेसी, स्मार्तना पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पाचपावलीचे ठाणेदार नरेंद्र हिवरे यांनी तर आभार अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी मानले.(प्रतिनिधी)समारोपीय कार्यक्रम रंगारंग समारोपीय कार्यक्रम रंगारंग झाला. देशभक्तीपर गीते, ज्युडो-कराटेचे प्रात्यक्षिक, नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी गुणवंत विद्यार्थी तसेच समाजोपयोगी माहिती देणाऱ्या स्टॉलधारकांना, चांगली प्रसिद्धी देणारे पत्रकार धीरज फरतोडे, रविकांत कांबळे आणि धनंजय टिपले यांचाही यावेळी सत्कार केला. शाळकरी मुलामुलींना सदर प्रदर्शनात सहभाग नोंदविल्यामुळे त्यांनासुद्धा गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सोनेगाव पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा देऊन गौरविण्यात आले.
तंत्र टेक्नो एक्स्पो-२०१७ चा समारोप
By admin | Published: January 28, 2017 2:06 AM