लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आकाशात ढग दाटून आल्याने शुक्रवारी वातावरण चांगलेच बदलले. २४ तासात कमाल तापमान ४.८ अंशाने घटले व पारा २५.२ अंशावर पोहचला. यामुळे दिवसा थंडी जाणवायला लागली. दिवसभर हवेत गारवा निर्माण झाला आहे. ढगांमुळे दिवसभर सूर्याचे दर्शनही झाले नाही.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमान सागर व आसपासच्या क्षेत्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. शिवाय निवार चक्रीवादळामुळे मध्य भारतातही आर्द्रता निर्माण झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात येत्या ३६ तासात आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबरच्या सुरुवातीलाच तामिळनाडू व पुडूचेरीच्या तटीय भागत पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.
नागपुरात शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढग दाटले होते आणि कोरडी हवा वाहत होती. हवेमुळे तापमानात घट नोंदविण्यात आली. पारा सामान्यपेक्षा ५ अंशाने खाली घसरल्याने थंडी जाणवायला लागली. दिवसभर ऊनही निघाले नाही. यामुळे यावर्षी पहिल्यांदा लोकांना दिवसा ऊनी कपड्यांचा आधार घ्यावा लागला. ढगांमुळे विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तापमानातही घट नोंदविण्यात आली. नागपूरसह बुलडाण्यात कमाल तापमान २५.२ अंश सेल्सियस म्हणजे सर्वात कमी नोंदविण्यात आले.
रात्री पारा ४.९ अंशाने वाढला
दिवसाच्या विपरीत आर्द्रता वाढल्याने रात्री तापमानात वाढ दिसून आली. पारा ४.९ अंशाने वाढून १९.४ अंशावर पोहचला. सामान्यपेक्षा ५ अंशाने वाढलेला असल्याने रात्रीच्या थंडीपासून थोडा दिलासा मिळाला.