लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी नागपुरात सकाळपासून आकाशात काळे ढग दाटले हाेते व दिवसभर थांबून थांबून रिपरिप सुरू हाेती. मात्र दाटलेले ढग खुलेपणाने बरसलेच नाही. दरम्यान, दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात ३.४ अंशाची घट झाली व तापमान ३०.८ अंश नाेंदविण्यात आले. उष्णतेचे प्रमाणही कमी राहिले.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढचे काही दिवस आकाशात ढग दाटलेले राहतील आणि काही काळाच्या अंतराने पाऊस हाेत राहील. मात्र जाेरदार पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज विभागाने नाेंदविला आहे. २३ जुलै राेजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेत असल्याने, मध्य भारतात त्याचे परिणाम हाेणे निश्चित मानले जात आहे. वर्तमानात दिसणाऱ्या परिस्थितीनुसार जुलैच्या अखेरच्या आठवड्यात जाेरदार पाऊस हाेण्याची शक्यता आहे.
नागपूर शहरात १ जून ते २० जुलै या काळात ४३२.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, जी सरासरीपेक्षा १ टक्का कमी आहे. संपूर्ण विदर्भात या काळात ३४२.६ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली, जी सामान्यपेक्षा ३ टक्के कमी आहे. या काळात विदर्भात सरासरी ३५३.४ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. जून महिन्यापर्यंत विदर्भाच्या बहुतेक जिल्ह्यात सरप्लस पाऊस हाेता, मात्र जुलैमध्ये पावसाचा जाेर चांगलाच मंदावला.
आर्द्रता कायम
शहरात मंगळवारी दिवसभर आर्द्रतेचा स्तर अधिक हाेता. पावसाच्या रिपरिपमुळे ही स्थिती हाेती. सकाळी ८.३० वाजतापर्यंत शहरात आर्द्रता ९३ टक्के हाेती, जी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ८३ टक्क्यांपर्यंत पाेहचली. साेमवारी सायंकाळी झालेल्या जाेरदार पावसामुळे मंगळवारी सकाळपर्यंत ४०.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली.