नागपूर : नागपुरात साधारणत: मे महिन्यात प्रचंड उष्णता वाढते; मात्र यंदा नागपुरातील पारा मे महिन्यातही बदललेल्या वातावरणामुळे वरखाली होताना दिसत आहे. रविवारी नागपुरात ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मागील २४ तासांमध्ये तापमानामध्ये १.२ अंश सेल्सिअसने घट झाली. किमान तापमान सामान्यापेक्षा ४ अंशाने कमी असल्याने उष्णता कमी जाणवली. दरम्यान, शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे शहरात अनेक भागात चांगला पाऊस झाला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ७.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रात्रीचे तापमानही ३.४ अंशाने खालावून २३ अंशावर पोहोचले.
हवामान विभागाच्या मते, दक्षिण-पश्चिम मध्यप्रदेशात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापर्यंत याचा परिणाम जाणवत आहे. या बदलामुळे आकाशात ढग दाटले असून पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. नागपुरात आणि विदर्भात याचा परिणाम जाणवत आहे. रविवारी अकोला येथील ४१.१ अंश सेल्सिअस तापमान वगळता अन्य सर्व ठिकाणी तापमान ४० अंशाच्या खालीच होते. पावसाचीही नोंद झाली. गोंदियात ३४ मिमी, अमरावतीमध्ये १५.२ मिमी, वर्ध्यामध्ये ७.२ मिमी, तर ब्रह्मपुरीमध्ये १ मिमी पावसाची नोंद झाली.
नागपुरात तीन दिवसांपूर्वी किमान तापमान ४१ अंशावर पोहोचले होते; मात्र आता सामान्यापेक्षा बरेच खालावले आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता आर्द्रता ७८ टक्के होती, तर सायंकाळी ४२ टक्के नोंदविली गेली.