नागपूर : एप्रिल महिन्यापासून तापमान चांगले तडकत असताना शनिवारी आकाशात जमलेल्या ढगांनी काहीसा दिलासा दिला. दुपारनंतर ढगाळ वातावरणामुळे तापमानात २.१ अंश सेल्सिअसची घट नोंदविण्यात आली. शनिवारी हवामान खात्याने ४१.६ अंश से. तापमानाची नोंद केली. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडेल अशी परिस्थिती होती; पण हवामान विभागाने ९ ते ११ मे दरम्यान ‘हीट वेव्ह अलर्ट’ दिला आहे. दरम्यान, पारा ४५ अंशांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीमध्ये व अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पूर्व मध्य बंगालच्या खाडीत वादळ तयार होत आहे. हे वादळ २४ तासात उत्तर-पश्चिमेच्या दिशेने जाईल. या दरम्यान विदर्भ व जवळपासच्या जिल्ह्यात एक सायक्लोनिक सर्कुलेशन तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भातील सर्वच जिल्ह्याच्या तापमानात १ ते ३ अंशाची घट बघायला मिळाली. नागपुरात रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासात ३.८ डिग्री सेल्सिअसची वाढ दिसून आली. किमान तापमान २८.४ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.
- तरीही विदर्भातील पारा ४० अंशावर
विदर्भात सायक्लोनिक सर्कुलेशनमुळे ढगाळ वातावरण राहिले; पण पारा ४० अंशावरच होता. चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक ४४ अंश नोंदविण्यात आले. बुलडाण्याचे तापमान सर्वात कमी ४०.८ अंश से. होते.