नागपूर : मुंबईच्या विमानात बसू न शकलेल्या १२ प्रवाशांनी आज सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळ घातला. विमानात बसण्यासाठी ठरवून दिलेल्या नियोजित वेळेवर एअरपोर्टवर न पोहोचल्यामुळे या प्रवाशांना टर्मिनल बिल्डिंगमध्येच अडविण्यात आले. कन्फर्म तिकीट असूनही विमानात बसू न दिल्यामुळे त्यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांची वॉकीटॉकी फेकून दिली.एअर इंडियाची फ्लाईट क्रमांक एआय ६२८ नागपूर-मुंबई नियोजित वेळेवर सकाळी ८.४० वाजता रवाना होणार होती. त्याची घोषणाही करण्यात येत होती. परंतु विमान उड्डाण घेण्यापूर्वी ३० मिनिटे आधी १२ प्रवासी विमानतळावर पोहोचले. यावेळी ‘चेक इन’ काऊंटर बंद झाले होते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानुसार विमान उड्डाणाच्या ३५ मिनिटापूर्वी चेक इन काऊंटर बंद करण्यात येते. चेक इन काऊंटरवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय प्रवाशांना विमानात बसू दिले जात नाही. १२ प्रवाशांच्या या ग्रुपला मुंबईमार्गे गोव्याला जायचे होते. यामुळे नाराज झालेल्या १२ प्रवाशांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून एका कर्मचाऱ्याची वॉकीटॉकी फेकली. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी सीआयएसएफच्या जवानांना पाचारण केले. सीआयएसएफच्या जवानांनी प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी निघून गेले. (प्रतिनिधी)
विमानतळावर प्रवाशांनी घातला गोंधळ
By admin | Published: March 19, 2015 2:26 AM