लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हील लाईन्स येथील प्रेस क्लबच्या पत्रपरिषद दालनात शनिवारी आयोजित एका पत्रपरिषदेदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीने आपल्या सहकाऱ्यासमवेत एका महिलेच्या आरोपावर आपली बाजू मांडण्यासाठी प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषद आयोजित केली होती. संबंधित महिलेला याबाबत माहिती मिळताच तीही तेथे पोहचली. पत्रपरिषद सुरू असतानाच महिलेने येथे पोहचून त्या व्यक्तीवर हल्ला करीत मारझोड करणे सुरू केले. महिलेने इसमाच्या गालावर अचानक थापड मारली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. येथे उपस्थित काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेचा विरोध सुरूच होता. यामुळे बराच वेळ प्रेस क्लबमध्ये गोंधळ उडाला होता. याबाबत चौकशी केली असता हा गोंधळ जुन्या प्रकरणामुळे झाल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी पत्रपरिषद घेऊन मॉल संचालकावर वीज आणि पाणी पुरवठा खंडित केल्याच्या वादावरून अनेक गंभीर आरोप केले होते. पाचपावली पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केल्याचे महिलेने सांगितले. या प्रकारात हा वाद अधिक चिघळला. या वादात आपली बाजू मांडण्यासाठी संबंधित व्यक्तीने पत्रपरिषद बोलावली होती. मात्र अचानक महिला तेथे पोहचल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली.
प्रेस क्लबमध्ये पत्रपरिषदेदरम्यान गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:23 PM