नागपूर : विदर्भाचा महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, शनिवारी करणार आहेत. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यात आयोजित विविध उद्घाटन, लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.
शनिवारी १०,४५ वाजता त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते गोसीखुर्दला रवाना होतील. २०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री साहेब, धान उत्पादकांची साडेसाती कायमची संपवा
जिल्ह्यात धानाचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ८० हजार हेक्टर आहे. सव्वादोन लाख शेतकरी धान पिकवितात. रात्रंदिवस मेहनत आणि नैसर्गिक संकटाचा सामना करवा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी महापूर आणि यातून धान बचावला तर किडींचे आक्रमण. घरात धान आला तरी विक्रीसाठी प्रतीक्षा. पणनच्या माध्यामातून धनाची खरेदी केली जाते. तुटपुंज्या आधारभूत किमतीत धान विकावा लागतो. मात्र येथेही शेतकऱ्यांची परवड थांबत नाही. चलाख धान खरेदी संस्था शेतकऱ्यांना नागवितात. यंदा तर अतिशय विदारक स्थिती आहे.
धानातून लागवड खर्चही निघणे कठीण. शेतातील उभा धान पेटविण्याची शेतकऱ्यांवर वेळ. घरातील धान विकण्याची सोय नाही. खरेदीचे कोणतेच नियोजन नाही. धान विकला तर पैसे कधी मिळतील याची खात्री नाही. अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला आहे. मुख्यमंत्री साहेब, आपण पहिल्यांदा भंडारा जिल्ह्यात येत आहात. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण आपणास आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धान उत्पादकांना मोठी आशा आहे. खरेदीचे कायमस्वरूपी नियोजनासोबत धानाला बोनसची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.