नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. ते गडचिरोली जिल्ह्याकडे मार्गक्रमण करण्याआधी माध्यमांशी बोलत होते.
दिवाळी सण यावर्षी आनंदात साजरा होत आहे. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याचा विकास हाच माझा ध्यास होता. पालकमंत्री असताना मी दरवर्षी त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करत असायचो. जे मी सुरू केलं तीच परंपरा कायम ठेवलीय. आपले जवान-पोलीस नक्षलवाद्यांशी दोन हात करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र एक करतात. आपली रक्षा करतात. पोलिसांचं मनोबल वाढवण्याकरता आपण आज त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी सांगितलं.
...हे हास्यास्पद
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातलं सरकार शेतकरीविरोधी आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची जबाबदारी राज्य सरकारची आहे, ही भूमिका घेऊन आम्ही दिवाळीनंतर राज्यपालांकडे जाणार असून राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी करू असं म्हटलं आहे, यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं हे विधान हास्यास्पद आहे, अशी खोचक टीका केली. आमच्या कामांमुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यामुळे विरोधी पक्ष असे बोलतच असतात. ते टीका करतात आम्ही त्यांच्या टीकेला कामाने उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभे
शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याबाबात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना पूर्ण मदत करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.