लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: प्रबोधनकारांनी अंधश्रद्धा, कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, त्याच प्रबोधनकारांचे वारसदार लिंबू फिरवण्याची भाषा करू लागले आहेत. या लिंबूटिंबूची भाषा करणाऱ्यांनी बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकारांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका करतानाच ‘हिऱ्यापोटी गारगोटी’ अशी म्हण असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता प्रहार केले.
रेशीमबागेत गेलो म्हणून मला हिणवले, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले काम करतो आहे, त्यामुळे रेशीमबागेत गेलो, तुमच्यासारखे गोविंदबागेत गेलो नाही, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांंना अप्रत्यक्षरीत्या लगावला.
अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना चिमटा
विधानसभेत राजकीय भाषण होत नाही; पण तुम्ही सारखे तेच सांगत आहात. सहा महिन्यांपूर्वी काय घडले हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तुम्ही त्यातून बाहेर या, आता तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात, असल्या छोट्या-छोट्या गोष्टींत मन रमवू नका. तुमच्या मुलाच्या वयाच्या मुलांना जास्त टार्गेट करत आहात. मुले म्हणून सोडून द्या, तुमच्या प्रवक्त्यांना बाहेर बोलायला सांगा, सभागृहात ते सांगू नका, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
सरकारला सहा महिने पूर्ण
सरकार स्थापन झाले त्याला शुक्रवारी सहा महिने पूर्ण झाले. तो धागा पकडत मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार पूर्ण कालावधी भक्कमपणे पूर्ण करील; तसेच येणाऱ्या निवडणुका बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युती बहुमताने जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.
अजित पवारांना टोला
मनात असूनही सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयांना आपण मोकळेपणाने दाद दिली नाही, हे मला जाणवले. तुमच्यावर महाविकास आघाडीचा दबाव असू शकतो, हे मी समजू शकतो. आपण माझ्या भाषणाला मिळालेल्या टाळ्या मोजत बसलात. ते करण्यापेक्षा घेतलेले निर्णय मोजले असते तर बरे वाटले असते, असा टोला शिंदेंनी अजित पवारांना लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"