CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. महायुतीचे नेत्यांनी प्रचारावर भर दिला आहे. यातच तब्बल १० वर्षांनी पंतप्रधान मोदी चंद्रपुरात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरमध्ये सभा आहे. चंद्रपूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सभा घेत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक बैठक झाली असून, बंददाराआड काही चर्चा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलो. चंद्रशेखर बावनकुळे विदर्भामध्ये खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातील जागा महायुती लढवत आहे. विदर्भातील वातावरण महायुतीमय झाले आहे. मोदीमय झाले आहे. महायुतीचे विदर्भातील सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास वाटतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
गेल्या ५० वर्षांत काय केले, याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा
विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही काम राहिलेले नाही. देवेंद्र फडणवीस त्यांच्या भागात सभा घेत आहेत. त्यांना ज्या ठिकाणी बोलावले जाईल, तिथे ते जात आहेत. मीही प्रचारात सहभाग घेत आहेत. अजित पवारही प्रचार करत आहेत. आम्ही सगळे प्रचारात गुंतलो आहोत. विरोधकांना काम उरलेले नाही. विरोधकांच्या आरोपांचा महायुतीवर काही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे. भक्कमपणे काम करत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत. ५०-६० वर्षे त्यांनी काही केले नाही. पंतप्रधान मोदी यांनी तेच गेल्या १० वर्षांत करून दाखवले. गेल्या ५० ते ६० वर्षांत काय केले, याचा हिशोब काँग्रेसने द्यायला हवा, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
दरम्यान, सरकारने केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीत नक्की मिळेल, असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आम्ही सगळे एकच आहोत. रामटेक प्रति अयोध्या आहे. लोकांनीच आता गॅरंटी घेतली आहे. तसाच माहोल सगळीकडे पाहायला मिळत आहे. नितीन गडकरी यांच्या रॅलीत सहभागी झालो होतो. महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करणे. मोदींची हॅटट्रिक होऊ द्यायची, असे जनतेनेच ठरवले आहे.