गोंदिया/भंडारा : गोरेगाव तालुक्यातील (जि. गोंदिया) एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिला शेतात विवस्त्र अवस्थेत सोडून दिले होते. या घटनेनंतर विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी धजावणार नाही असे कठोर शासन आरोपींना करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांशी देखील चर्चा केली. पीडित महिलेला सर्वतोपरी उपचार मिळावेत, कुठलीही हयगय यात होणार नाही हे पाहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासानाला दिले आहेत.
घटनाक्रम
ही महिला गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. पतीने सोडून दिल्याने पीडिता तिच्या बहिणीच्या घरी राहायची. ३० जुलै रोजी तिचा बहिणीसोबत किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात तिने घर सोडले आणि माहेरी जाण्यासाठी निघाली. पायी जात असतांना एकाने मदतीच्या बहाण्याने आपल्या चारचाकी मध्ये बसविले आणि त्यानंतर तिच्यावर तब्बल दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.
ती कशीबशी जंगलातून निघून भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह गावातील धर्मा ढाब्यावर पोहोचली. तिथे घरी सोडून देण्याच्या बहाण्याने अन्य आरोपींनी पीडितेवर पाशवी अत्याचार केला. नंतर तिथेच सोडून दोघांनीही पळ काढला. २ ऑगस्ट रोजी सकाळी सदर महिला विवस्त्र अवस्थेत शेतात आढळली. एका शेतात बेशुद्धावस्थेत विवस्र महिला असल्याची माहिती स्थानिकांनी कारधा पोलिसांना दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळावरील दृष्य पाहून पोलिसही हादरले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्या महिलेला सर्वप्रथम कपडे घातले. तात्काळ भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला नागपूर येथे रवाना करण्यात आले.