नागपूर : पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेला निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला आज रेल्वेने खापरखेडा क्रॉसिंगवर 'रेड सिग्नल' दिला. परिणामी तब्बल १५ मिनिटे मुख्यमंत्र्यांचा ताफा तेथे अडकून पडला. या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.
रामटेक मतदार संघाचे महायुतीच्या शिंदे सेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे कोराडी खापरखेडा मार्गे पारशिवनीकडे जात होते. सुमारे ११.१५ च्या सुमारास त्यांचा ताफा खापरखेडा ब्रॉडगेज रेल्वे क्रॉसिंगजवळ आला. मात्र, तेथून छिंदवाडा पॅसेंजर ही रेल्वेगाडी जाणार असल्याचा निरोप मिळाल्याने काही क्षणापूर्वीच गेटमने क्रॉसिंग फाटक बंद केले. त्यामूळे मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा गेटवर अडकून पडला.
साधारणत: ४० ते ५० गाड्या या ताफ्यात होत्या. खुद्द मुख्यमंत्र्यांचा ताफा गेटवर अडकल्याने आता उघडेल, नंतर उघडेल, असे प्रत्येकाला वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. दरम्यान, क्रॉसिंगच्या दोन्ही बाजूला सुमारे १ किलोमिटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तब्बल १५ मिनिटे झाल्यानंतर आणि काही अधिकाऱ्यांकडून 'फोनाफोनी' झाल्यानंतर क्रॉसिंग गेट उघडले गेले अन् पुढच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा ताफा मार्गस्थ झाला.
नेते-कार्यकर्त्यांकडून संधीचे सोनेखापरखेडा क्रॉसिंगवर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा अडकून पडल्याची माहिती मिळाल्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संधीचे सोने करण्यासाठी तिकडे धाव घेतली. मुख्यमंत्र्यांना भेटून, हस्तांदोलन करून त्यांनी संधीचे सोने करून घेतले.