नागपूर : वारंवार सांगूनही राज्य सरकारने जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत कोळशाचा स्टॉक केला नाही. व आता केंद्र सरकारवर त्याच खापर फोडत आहेत. दुसरीकडे राज्याचे उर्जामंत्री विविध कारणे सांगून महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत. महाविकास आघाडी सरकार आपलं पाप केंद्रावर ढकलतायत, असा आरोप भाजप नेते आ. चंद्रशेखर बावनकुळे केला.
मागील सरकारपेक्षा जास्त कोळसा या सरकारला देण्यात आला, केंद्राने मदत केली पण २५०० मेगावॉटचे प्लांट बंद पडले यात राज्य सरकारचं फेल्युअर आहे, असे बावनकुळे म्हणले. उर्जामंत्री आणि वित्तमंत्र्यांच्या वादात महाराष्ट्र भरडला जात असून एक नंबरच विजेचं राज्य असलेल्या महाराष्ट्राला या सरकारने अंधारात टाकण्याचं काम केल्याचेही बावनकुळे म्हणाले. सरकारनं भ्रष्टाचाराचं मूळ सोडलं तर राज्य एका तासाच्या आत लोडशेडिंगमुक्त होऊ शकते, अशी खोचक टीकाही बावनकुळे यांनी राज्य सरकारवर केली.
आज राज्यात वीज टंचाईचे संकट आहे, अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू असून जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतोय. भाजप सरकारच्या काळात एकही तासाचे लोडशेडिंग नव्हते, शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम आम्ही केले. मात्र, महाविकास आघाडीतील मंत्री आपसात वाद करीत असल्याने नुकसान होत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
वीज खरेदीमध्ये एक मोठा भ्रष्टाचार करण्याचा या सरकारचा उद्देश्य आहे. महाराष्ट्राला लोडशेडिंग दाखवायची, आपले प्लांट ब्रेक डाऊन दाखवायचे आणि दुसरीकडे महागडी वीज खरेदी करून जनतेकडून पैसा वसूल करायचा. आणि त्या महागड्या वीज खरेदीमध्ये युनिटवाईज भ्रष्टाचार करायचा, हा या सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप बावनकुळेंनी केला.