नागपूर : मेट्रो रेल्वेचे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांनी (रिच ३-ऑरेंज अॅक्वा लाईन) येथील शंकरनगर चौक तसेच रचना जंक्शन मेट्रो स्टेशनची पाहणी करून प्रवाशांसाठी असलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यांनी पाहणी दरम्यान केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.
‘सीएमआरएस’च्या अधिकाऱ्यांनी एएफसी गेट, इमर्जन्सी कॉल पॉईंट, प्लॅटफार्म परिसरातील इमर्जन्सी स्टॉप प्लंगर, लिफ्ट आणि एस्केलेटर, स्टेशन परिसरातील प्रवाशांसाठी असलेले प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केअर रुम, दिव्यांगांसाठी विशेष प्रसाधनगृह, मार्गदर्शिका, सूचना फलक आदींची पाहणी केली. सीएमआरएसच्या पथकाने सिग्नलिंग उपकरणाची खोली, टेलिकॉम उपकरणाची खोली, ट्रान्सफॉर्मर, स्टेशन नियंत्रण कक्ष, हॉट स्टँडबाय वर्कींग इलेक्ट्रीकल या विविध सुरक्षा उपकरणांची पाहणी केली. यावेळी आणीबाणीच्या परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांची समीक्षा करण्यासाठी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. अॅक्वा लाईन मार्गावर रचना जंक्शन, शंकरनगर चौक क्षेत्रात मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. या स्टेशनच्या उत्तर व दक्षिणेकडील बाजूने ये-जा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्राऊंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफार्म अशा तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व स्टेशन कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. उत्तर अंबाझरी मार्गावरील रचना जंक्शन आणि शंकरनगर चौक मेट्रो स्टेशन अॅक्वा थीमवर बनविण्यात आले आहे. हिंगणा मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाशांची गर्दी होते. नुकतेच रहाटे कॉलनी, अजनी चौक, बन्सीनगर आणि एलएडी मेट्रो स्टेशन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. पाहणी दरम्यान प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक व सिस्टीमचे संचालक सुनील माथुर वित्त विभागाचे संचालक एस. शिवमाथन, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, जे. पी. डेहरिया, गिरधारी पौनीकर, राजेश पाटील, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, नामदेव रबडे, आशिष सांघी व अधिकारी उपस्थित होते.
.............