नागपूर : पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जाते. पेट्रोल आणि डिझेलच्या कारच्या तुलनेत सीएनजीवर धावणाऱ्या कारचा मायलेज जास्त असतो. सीएनजीच्या मुबलक उपलब्धतेमुळे पश्चिम महाराष्ट्रात सीएनजीवर धावणाऱ्या कारला जास्त मागणी आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागात सीएनजीचे दर नागपूरपेक्षा जवळपास ३० ते ३५ रुपये किलोने स्वस्त आहेत. नागपुरात सीएनजीची थेट पाईपलाईन नसल्यामुळे ११४ रुपये किलोने विकला जात आहे.
सीएनजी १०८ वरून ११४ रुपयांवर
नागपुरात सीएनजीची थेट पाईपलाईन नसल्यामुळे महाराष्ट्रात नागपुरात सीएनजी सर्वांत महाग विकला जातो. काही दिवसांआधी १०८ रुपये किलो असलेला दर सहा रुपये किलोने वाढून ११४ रुपयांवर गेला आहे.
डिझेल ९२.५६ रुपयांवर
डिझेलचा दर १४ जुलैपासून वाढलेला नाही. डिझेल सध्या दर ९२.५६ रुपये लिटर आहे. नागपुरात डिझेलवर धावणाऱ्या कारला पेट्रोलच्या तुलनेत जास्त मागणी आहे.
पेट्रोल १०६.०१ रुपयांवर
पेट्रोलचा दर तीन महिन्यांपासून ‘जैसे थे’ अर्थात १०६.०१ रुपये लिटर आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून सीएनजी कारला जास्त मागणी आहे. पण उपलब्धता कमी असल्यामुळे नागपुरात सीएनजी कारची विक्री कमीच आहे.
शहरात सीएनजीचे केवळ चार पंप
नागपुरात सीएनजी इंधनाची थेट पाईपलाईन नसल्यामुळे नागपुरात हरियाणा सिटी गॅस या कंपनीचे विक्रेते रॉमॅटचे चार पंप आहेत. केवळ याच पंपावर सीएनजीची विक्री केली जाते. या पंपावर कारचालकांच्या रांगा असतात.
कुठलेच वाहन परवडेना
इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कुठलेच वाहन परवडणारे नाही. महिन्यातून काहीच दिवस कारचा उपयोग करतो. पेट्रोल कारचा ॲव्हरेज फार कमी आहे. इंधनाच्या जास्त किमतीमुळे सामान्यांना कुठलेच चारचाकी वाहन परवडत नाही.
विश्वास सोमनाथे, वाहनचालक.