लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.ऑटोमोटिव्ह चौकाजवळील रॉमॅट सीएनजी पंपाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले, सध्या महानगरपालिकेच्या बसेस डिझेलवर धावतात. डिझेलची किंमत ६९ रुपये लिटर असून त्यापासून ३ किलोमीटरचे अॅव्हरेज मिळते. प्रति किलोमीटर त्याची किंमत २३ रुपये होते. सीएनजी ४६ रुपये किलो असून ४ किलोमीटरचे अॅव्हरेज देते. त्याची किंमत दर किलोमीटरला ११.५० रुपये पडते. त्यामुळे महापालिकेच्या ४५० बसेसचे सीएनजीत रूपांतर करण्यात येणार आहेत. एलएनजी हे भविष्यातील इंधन आहे. ५० किलोमीटरच्या अंतरासाठी सीएनजी हे इंधन चांगले आहे. यात डिझेलच्या तुलनेत मोठी बचत होते. ट्रॅक्टरसाठी त्याचा फायदा होण्याची गरज आहे. आगामी काळात विदर्भातील शेतकरी सीएनजी तयार करतील, अशी संकल्पना आहे. सध्या आमच्या प्रकल्पात १८ टन सीएनजी तयार करीत आहोत. तणसापासून सीएनजी तयार करण्याचे पाच प्रकल्प टाकत आहोत. तुमसरमध्ये एक प्रकल्प सुरू आहे. पाच टन तणसापासून एक टन सीएनजी तयार होणार आहे. रामटेक तालुक्यात लिपिअर ग्रास लावणार आहे. एक एकरात २०० टन लिपिअर ग्रास होईल. हे गवत बायो डायजेस्टरमध्ये टाकून त्यापासून बायो सीएनजी तयार करण्याची योजना आहे. विदर्भात यामुळे एक लाख रोजगार निर्मिती होऊन शेतकऱ्यांनाही एका एकरात दोन लाखाचा फायदा होईल. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि वर्धाला डिझेलपासून मुक्ती देणार आहोत. महापालिकेत सात बायो डायजेस्टर आहेत. टॉयलेटचे पाणी विकून १८० कोटी रुपये मिळत आहेत. सात बायो डायजेस्टरमध्ये घाण पाण्यापासून मिथेन काढून मिथेनपासून ‘सीओ-२’ वेगळे करून बायो सीएनजी काढणार आहोत. मटन, मच्छी मार्केटमधील वेस्टपासून बायो सीएनजी तयार करण्यात येणार आहे. या मार्गाने ट्रॅक्टर, बसेससाठी सीएनजी मिळणार आहे. ते प्रदूषणमुक्त असून जैविक इंधन आहे. स्पाईस जेटचे विमान २५ टक्के बायो एव्हीएशन फ्युअलवर डेहरादुन ते दिल्लीला आणले होते. भविष्यात लिपिअर ग्रास, तुराट्यापासून बायो सीएनजी तयार करून बसेस धावतील. त्यामुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के बचत होणार आहे.
‘सीएनजी-एलएनजी’मुळे पैशांची बचत व प्रदूषणमुक्ती : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 9:29 PM
सीएनजी, एलएनजीमुळे पैशांची बचत होऊन त्यासोबतच शहर प्रदूषणमुक्त होणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना फायदा होऊन रोजगार निर्मिती होणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
ठळक मुद्दे डिझेलच्या तुलनेत होणार मोठी बचत