लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: २०२४-२५ पर्यंत कोळशाची आयात बंद करणार असल्याची घोषणा केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शुक्रवारी नागपुरात केली. केंद्र सरकारने देशातील कोळशाचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवीन धोरणामुळे हे उद्दिष्ट गाठणे सोपे होणार असल्याचा त्यांनी दावा केला.
चिटणवीस केंद्र येथे शुक्रवारी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, वेद कौन्सिल आणि एमएम ॲक्टिव्ह यांच्या वतीने आयोजित ‘मिन्कॉन’ या खाण प्रदर्शन व संमेलनाच्या उद्घाटन सत्रात जोशी बोलत होते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खाण मंत्री दादाजी भुसे, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाचे अध्यक्ष आ. आशिष जैस्वाल, वेदचे देवेंद्र पारेख, शिवकुमार राव, रवी बोरटकर प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योगाजून मिळणारा महसूल गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे हेच केंद्र सरकारचे धोरण आहे.
या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये खाण धोरणात सुधारणा करून केंद्र सरकारने राज्याला ९० टक्के अधिकार दिले आहेत. कोळसा खाणकामाचे उत्पन्न ५० हजार कोटींपर्यंत वाढवणाऱ्या ओडिशाचे उदाहरण देत त्यांनी या धोरणाचे चांगले परिणाम झाल्याचा दावा केला. नवीन धोरणानुसार ४७ खाणींचा लिलाव करण्यात आला आहे. खाणीजवळच संबंधित उद्योगांचा विकास होईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राने खाण विकासात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
सध्या कोळशाची कमतरता नाही
देशात कोळशाचा तुटवडा नाही. १० वर्षांपूर्वी ऑक्टोबरमध्ये १० ते १५ दशलक्ष टन कोळशाचे उत्खनन झाले आहे, तर वर्षाला ६० हजार मिलियन टन उत्खनन होत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढत असल्याने कोळसा आयात करण्याची गरज नाही, असे जोशी यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"