लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (खापरखेडा/पारशिवनी) : अंदाजे २० कोळसा माफियांनी सिंगोरी (ता. पारशिवनी) खुली कोळसा खाण (ओपन कास्ट माईन्स) कार्यालयात प्रवेश करून खाण व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला चढवित त्यांना बेदम मारहाण केली. शिवाय, त्यांनी व्यवस्थापकांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. कोळसा चोरीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केल्याने हा हल्ला चढविण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. ही घटना गुरुवारी (दि. ३१) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.राजेंद्र बळवंतराव ठाकरे (५०, रा. नागपूर) असे जखमी खाण व्यवस्थापकांचे नाव आहे. महेंद्र मेश्राम हा गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्याच्या अंदाजे २० साथीदारांसह सिंगोरी खाण परिसरातील ‘ओपी डम्प’ भागात कोळसा चोरण्यासाठी आला होता. खाण पर्यवेक्षक प्रणय मेश्राम यांनी या प्रकाराची माहिती लगेच व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे यांना दिली. त्यामुळे ठाकरे व सुरक्षा निरीक्षक गोपाल यादव लगेच घटनास्थळी पोहोचले. या दोघांनीही महेंद्र मेश्राम व त्याच्या साथीदारांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शस्त्र व काठ्यांचा धाक दाखवित त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर कोळसा चोरी करणे सुरूच ठेवले.त्यामुळे सुरक्षा रक्षक मदनकर यांनी या प्रकाराची माहिती पारशिवनीचे ठाणेदार वंजारी यांना दिल्याने वंजारी यांनी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांना पाहताच सर्वजण तिथून निघून गेले. दरम्यान, दुपारी १२ वाजताच्या सुमारास महेंद्र मेश्राम व त्याचे साथीदार खाण कार्यालयात शिरले. त्यांनी काही कळण्याच्या आत व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे, कार्यालयीन कर्मचारी अनुप येवले, कमल जसवाणी, विशाल रडके यांना शिवीगाळ करीत मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी महेंद्रच्या हातात तलवार होती तर त्याच्या साथीदारांच्या हातात फायटर व काठ्या होत्या.त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीला आलेल्या प्रदीप ताकसांडे, अरविंद दीपे, गोपाल यादव, अनुप नवले या कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. त्यात राजेंद्र ठाकरे यांना दुखापत झाली.या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंवि ३५३, ३३३, २९४, १४३, १४७, १४८, १४९, १८६ सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम कलम ३, ४, ७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.अटकेतील आरोपीमहेंद्र मेश्राम व त्याच्या साथीदारांनी कार्यालयातील साहित्याची तोडफोड करायला सुरुवात केली. त्यातच व्यवस्थापक राजेंद्र ठाकरे यांनी कार्यालयातून पळ काढला. त्यांनी कार्यालयाच्या बाहेर येत ठाकरे यांच्या एमएच-३१/एफसी-१९२९ क्रमांकाच्या बोलेरोच्या काचा फोडल्या. यात शासकीय मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. या प्रकरणात पारशिवनी पोलिसांनी मुख्य आरोपी महेंद्र मेश्राम (४०), मुकुल भाऊदास पाटील (२२) दोघेही रा. डोरली, ता. पारशिवनी, दिनेश नारायण गोंडाने (१९), गणपत पुनबा मारबते (३०), दिनेश विठोबा पोंगाळे (२०), प्रमोद प्रभू हुमने (३०), किशोर नारायण गोंडाने (२१) व अनमोल चंद्रशेखर मेश्राम (२१) सर्व रा. सिंगोरी, ता. पारशिवनी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.कोळसा चोरीतून गुन्हे वाढलेपारशिवनी तालुक्यातील सिंगोरी, गोंडेगाव तसेच सावनेर तालुक्यातील सिल्लेवाडा कोळसा खाण परिसरातून कोळसा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: पारशिवनी परिसरात कारवाई करीत कोळसा पकडला होता. एवढेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी कोळशाच्या चोरीतून कन्हान परिसरात एका उपसरपंचाचा खूनही करण्यात आला होता. या कोळसा चोरीतून जन्माला आलेली गुन्हेगारी ही पोलीस प्रशासन व नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरली आहे.
खाण व्यवस्थापकांवर कोळसा माफियांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 8:20 PM
अंदाजे २० कोळसा माफियांनी सिंगोरी (ता. पारशिवनी) खुली कोळसा खाण (ओपन कास्ट माईन्स) कार्यालयात प्रवेश करून खाण व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांवर सशस्त्र हल्ला चढवित त्यांना बेदम मारहाण केली. शिवाय, त्यांनी व्यवस्थापकांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. कोळसा चोरीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केल्याने हा हल्ला चढविण्यात आल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. ही घटना गुरुवारी (दि. ३१) दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील सिंगोरी येथील घटना : कार्यालयात शिरून केली मारहाण