लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरखेडा परिसरातील भानेगाव खुली कोळसा खाण सुरू झाली तरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. भानेगाव जुन्या वस्तीत जवळपास ८०० नागरिक वास्तव्यास आहेत, मात्र या खाणीतून कोळसा काढण्यासाठी रात्रीबेरात्री दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे. जीव मुठीत घेऊनच नागरिकांना जीवन जगावे लागत आहे. परंतु या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने शेकडो नागरिकांनी शनिवारी ठिय्या आंदोलन पुकारले होते.विशेषत: कोळसा खाणीतून निघणारी माती गावालगत डम्पिंग करीत असल्याने नागरिकांना नव्याने प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे.या संदर्भात वारंवार निवेदने दिली. मात्र संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. अखेर शनिवारी (दि.१०) भानेगावचे सरपंच रवींद्र चिखले यांच्या नेतृत्वात सुमारे २०० नागरिकांनी डम्पिंग यार्डाजवळ ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे गावकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.भानेगाव ओपन कास्ट कोळसा खाणीसाठी दुसऱ्या टप्प्यात कोल बेरिंग अॅक्ट सेक्शन ९ नुसार परिसरातील जवळपास १३१.९० हेक्टर शेती वेकोलि प्रशासनाने संपादित केली. यातील बहुतांश शेतकऱ्यांशी वेकोलि प्रशासनाने करारनामे केले असून त्यांना मोबदला व नोकऱ्या दिल्या आहेत. मात्र भानेगाव जुन्या वस्तीतील पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. त्यामुळे गावाचे पुनर्वसन कधी, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. भानेगाव ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासनाला जुन्या वस्तीतील ३२८ घरांची यादी दिली असून १० टक्के वाढीव आबादी दिली आहे. मात्र अजूनही येथील घरांचे मूल्यांकन करण्यात आले नाही.या खुल्या खाणीत लाखो टन कोळशाच्या उत्पादनाला सुरुवात झाली. त्यामुळे वेकोलि प्रशासनाची चांदी आहे. परंतु प्रकल्पग्रस्त नागरिक रामभरोसे आहे. सदर कोळसा खाणीत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घरांना भेगा गेल्या आहेत. त्यामुळे जुनी वस्ती गावातील नागरिकांचे पुनर्वसन करणे गरजेचे झाले. गावालगत कोळसा खाणीतून निघणारी माती अन्य ठिकाणी डम्पिंग करण्यात यावी तसेच पुनर्वसन लवकर करण्यात यावे, या प्रमुख मागण्या गावकऱ्यांनी आंदोलनात रेटून धरल्या.खापरखेडा पोलिसांनी मध्यस्थाची भूमिका वठविली. आंदोलनात सरपंच रवींद्र चिखले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विजय वासनिक, विकास बारई, सतीश ढोके, नंदू डोंगरे, भारती नागरकर, सतीश शिंदूरकर, अरविंद चिकणकर, शिवहरी आसुटकर, विनोद नागरकर, कैलास शिंगणे, छत्रपाल शिंदूरकर, मीना युवनाते, शशिकला तांडेकर, संजय गोटे, सचिन नागरकर, वसंता शिंदूरकर, कैलास बर्वे, सुनील तराळे आदींसह मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक सहभागी झाले होते.
कोळसा खाणीतील ब्लास्टच्या भयाखाली जगते आहे नागपूर जिल्ह्यातले भानेगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 12:00 PM
खापरखेडा परिसरातील भानेगाव खुली कोळसा खाण सुरू झाली तरी गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.
ठळक मुद्देनागरिकांनी केले ठिय्या आंदोलनपुनर्वसन होणार केव्हा?