एस.के.जिंदल यांचे प्रतिपादन : ‘नॅशनल पल्मोनोलॉजी मीट’ला तज्ज्ञांची गर्दीनागपूर : जगभरात फुफ्फुसाच्या आजाराने दगावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. जनजागृती होत असली तरी त्याचा सरळ प्रभाव मनुष्याच्या मानसिकतेवर होत नाही. प्रदूषण वाढतच आहे, धूम्रपानाच्या सवयी कमी झालेल्या नाहीत. यामुळे फुफ्फुसांचा ‘कोळसा’ होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र दुसरीकडे तज्ज्ञांची संख्या वाढल्याने लवकर निदान होत आहे. प्रभावी उपचार पद्धतीमुळे रुग्णांचा जीव वाचविणेही शक्य झाले आहे, असे मत चंदीगड येथील प्रसिद्ध उर व क्षयरोग तज्ज्ञ डॉ. एस.के.जिंदल यांनी येथे व्यक्त केले.‘बेटर रेस्पीरेटरी एज्युकेशन अॅन्ड टेक्निकल हेल्थ एज्युकेशन, ट्रस्ट’च्यावतीने दोन दिवसीय ‘नॅशनल पल्मोनोलॉजी मीट-२०१७’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. एस.के. जिंदल, डॉ. दिगंबर बेहेरा, परिषदेचे आयोजन सचिव डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. कमल भुतडा, डॉ. दीपक जेसवानी, डॉ. निर्मल जयस्वाल व डॉ. रणदीप गुलेरिया उपस्थित होते. या परिषदेला देशाच्या विविध भागातून ३५० तज्ज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेला व ‘अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स’, ‘असोसिएशन आॅफ फिजिशियन’ आणि ‘इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेड’चे (आयएससीसीएम) सहकार्य मिळाले होते.डॉ. जिंदल म्हणाले, श्वसनाच्या आजारासह सीओपीडी, फुफ्फुसाचा कॅन्सर आदी आजार वाढले आहेत. लवकर निदान होत असल्याने या रुग्णांची संख्या मोठी दिसून येत आहे. सिटी स्कॅन व जैविक मार्करमुळे फुफ्फुसाचा कॅन्सर लवकर कळतो. पूर्वी या रोगावर देण्यात येणाऱ्या केमोथेरपीचे फार दुष्परिणाम दिसायचे. परंतु आता अधिक प्रभावी औषधे आल्याने चांगल्या पेशी नष्ट होत नसल्याने औषधांचे दुष्परिणाम कमी झाले आहेत. परिषदेच्या आयोजनात ‘अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्स’चे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चाम, सचिव डॉ. रवींद्र सरनाईक, ‘असोसिएशन आॅफ फिजिशियन’चे अध्यक्ष डॉ. एस.डी. सूर्यवंशी, सचिव डॉ. निर्मल जयस्वाल, व ‘आयएससीसीएम’चे अध्यक्ष डॉ. दीपक जेसवानी व सचिव डॉ. कमल भुतडा आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)सीओपीडीवर नवीन उपचार पद्धती : डॉ. सरनाईक डॉ. रवींद्र सरनाईक म्हणाले, फुप्फुसांच्या विकाराचे प्रमाण जगभरात चिंताजनकरीत्या वाढत आहे. श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘क्रॉनिक आॅब्स्ट्रॅक्टीव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) या गंभीर आजाराचे लक्षण आहे. पूर्वी या आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी पाच ते सहा औषधे रोज घ्यावी लागायची. परंतु आता नवीन उपचार पद्धती आल्याने दिवसभरात केवळ एकच औषध घ्यावे लागत आहे, शिवाय फुफ्फुस खराब होण्याची शक्यता कमी झाली आहे. ‘लाबा-लामा कॉम्बिनेशन’मुळे औषधाचा दुष्परिणामही राहिलेला नाही. अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास ‘सीओपीडी’ची भीती - डॉ. भट्टाचार्यडॉ. पी. भट्टाचार्य म्हणाले, सीओपीडी’ व ‘अस्थमा’च्या रुग्णांची काही लक्षणे सारखीच असतात. यामुळे रुग्णांची योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक ठरते. हे दोन्ही आजार असलेल्या ‘अॅकॉस’चे रुग्ण वाढल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे, अस्थमा असतानाही धूम्रपान केल्यास व औषधे योग्य पद्धतीने न घेतल्यास पुढे ‘सीओपीडी’ होण्याची शक्यता असते. अस्थमावर योग्य औषधोपचार केल्यास तो बरा होऊ शकतो. परंतु सीओपीडी बरा होत नाही, त्याला नियंत्रणात ठेवता येते. क्षयरोग रुग्णांच्या नोंदणीमुळे आजारावर नियंत्रण शक्य : डॉ. बेहेराडॉ. दिगंबर बेहेरा म्हणाले, आता राज्यात क्षयरोगाच्या रुग्णांची नोंदणी होत आहे. यामुळे एकूण रुग्णांची संख्या समोर येऊन प्रभावी उपाययोजना करणे शक्य होईल. शिवाय ‘सीबी-नॅट’ उपकरणामुळे लवकर निदान, ‘रोज उपचार’पद्धती व काही खासगी इस्पितळांमध्ये रुग्णांना नि:शुल्क उपचार व औषधोपचार मिळत असल्याने क्षयरोगावर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
फुफ्फुसांचा होतोय कोळसा
By admin | Published: April 12, 2017 1:49 AM