नगर परिषद क्षेत्रातच प्रभावविकास कामांना ब्रेक नाही : महापालिका-जि.प.सदस्यांना भूमिपूजनाची मुभानागपूर : राज्यात होऊ घातलेल्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली होती. काही मोजके जिल्हे सोडले तर राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातच आचारसंहिता लागू करण्यात आल्याने विकास कामे रखडणार होती. या संदर्भात सर्वत्र नाराजी व्यक्त क रण्यात आली होती. याची दखल घेत काही शर्तींच्या आधारावर महापालिका व जिल्हा परिषद क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे नागपूर शहर व जिल्ह्यातील विकास कामांना ब्रेक लागण्याचा धोका टळला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी बुधवारी आचारसंहितेबाबत दिशानिर्देश जारी केले आहे. त्यानुसार ही आचारसंहिता केवळ संबंधित नगर परिषद व संबंधित नगर पंचायतीपुरतीच मर्यादित राहणार आहे. महापालिका व जिल्हा परिषद क्षेत्रातील विकास कामांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच कामांचे भूमिपूजन, उद्घाटन करता येतील. शासकीय वाहनेसुद्धा वापरता येतील. परंतु जिल्हा परिषद व महापालिका क्षेत्रातील भूमिपूजन किंवा उद्घाटन व इतर कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून ज्या नगरपरिषदांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासंबंधी कुठलीही घोषणा करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी आचारसंहिता जाहीर करताच भाजप नेत्यांनी व महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. सहारिया यांच्याशी महापौर प्रवीण दटके यांनी संपर्क साधून महापालिका क्षेत्रात आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली होती.पाच हजार कोटींच्या कामांना बसला असता फटकामहापालिकेच्या २०४७ कोटींच्या अर्थसंकल्पातील जेमतेम ३०० कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात आचारसंहिता कायम असती तर १५०० कोटींची कामे प्रभावित झाली असती. तसेच केंद्र व राज्य सरकारची प्रस्तावित प्रकल्पांची कामे सुरू करता आली नसती. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास योजना बाधित झाल्या असत्या. यामुळे शहर व जिल्ह्यातील पाच हजार कोटींच्या विकास कामांना फटका बसला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विकास कामे रखडणार नाहीमहापालिका क्षेत्रातील आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बुधवारी दिली. परंतु नगर परिषदा व नगर पंचायतीच्या निवडणुकीवर कोणत्याही स्वरूपाचा परिणाम होणार नाही, असे वक्तव्य करू नका अशी सूचना त्यांनी केली आहे. निवडणूक आयुक्तांनी आचारसंहिता शिथिल केल्याने शहरातील विकास कामे रखडणार नाही. विकासाची गती कायम राहील. आयुक्तांनी चांगला निर्णय घेतला आहे. - प्रवीण दटके, महापौरमनपा व जि.प.च्या कामांवर परिणाम नाहीनिवडणूक आयुक्तांनी आचारसंहितेबाबत बुधवारी काही दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार ज्या नगर परिषदांमध्ये निवडणुका होणार आहे, त्या भागातील मतदारांवर प्रभाव पडेल, असे कुठलेही कृत्य, घोषणा करता येणार नाही. जि.प. व मनपा क्षेत्रातील विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन कामांचे भूमिपूजन व उद्घाटनही करता येईल. - सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी, नागपूर
आचारसंहिता शिथिल
By admin | Published: October 20, 2016 2:57 AM