लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाचा आदर्श जिल्हा परिषदेने ठेवला आहे. जिल्हा परिषदेमध्ये लावण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कोनशिला झाकण्यात आल्या आहे. त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या विकास कामांबाबतच्या बैठका, घेण्यात येणारा आढावा यांचेही टेन्शन कमी झाले आहे. त्यामुळे जि.प.च्या प्रशासकीय कामकाजातही शिथिलता आहे. विशेष म्हणजे मुख्यालयी कामानिमित्त येणाऱ्यांचीही वर्दळ कमी झाल्याने शुकशुकाट पसरला आहे.जि.प.मार्फत सेस फंडातील देण्यात येणाऱ्या लाभाच्या योजनेचे काम सर्वच विभागांचे बऱ्यापैकी पूर्ण झाले असल्याचा दावा विभागाकडून करण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना डीबीटीवर राबविण्यात येत असल्याने आचारसंहितेमुळे साहित्याच्या खरेदीनंतर खात्यात पैसे जमा होणार की नाही, अशी भीती लाभार्थ्यांना होती. ज्या योजनेचे लाभार्थी निवडले गेले आहे. त्यांनी साहित्य खरेदी करताच त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येईल, आचारसंहितेशी त्याचा काहीही संबंध नसल्याचे सीईओंनी सांगितले आहे. आचारसंहितेमुळे सामान्य नागरिकांची कामासाठी मुख्यालयात येण्याची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे अधिकारीही सध्या रिलॅक्स असल्याचे दिसून येत आहे. जि. प. ने तर आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये म्हणून चांगलेच मनावर घेतले आहे. आचारसंहितेच्या कालावधीत कुठल्याही प्रकारच्या विकासकामांना मान्यता देणे अथवा त्यांचे उद्घाटन करणे याला मनाई आहे. त्यामुळे असे कुठलेही काम आपल्या हातून होऊ नये याची जि.प. प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:46 PM
विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाचा आदर्श जिल्हा परिषदेने ठेवला आहे. जिल्हा परिषदेमध्ये लावण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कोनशिला झाकण्यात आल्या आहे.
ठळक मुद्देउद्घाटनाच्या भूमिपूजनाच्या कोनशिला, फलक झाकले : कामकाजातही आली शिथिलता