लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होतो. विशेषत: लहान मुले लवकर आजारी पडतात. सध्या कोरोनाच्या दहशतीत सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डॉक्टरांच्या मते, भीती बाळगू नका, काळजी घ्या. प्रत्येक सर्दी, ताप आदी लक्षणे कोविडचीच असतील, असे नाही. परंतु स्वत:हून औषधी घेण्यापेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. दोन वर्षांवरील मूल असेल तर त्याला मास्क लावा, असा सल्लाही दिला आहे.पावसाच्या आगमनामुळे जरी घाम व गरमीपासून सुटका झाली असली तरी, पावसाळ्यामुळे अनेक आरोग्य समस्या डोके वर काढू शकतात. सामान्यत: अस्वच्छ पाणी व अन्न या माध्यमातून अनेक पावसाळी आजार निर्माण होतात. विशेषत: या दिवसात सर्दी, खोकला व तापाचे अधिक रुग्ण दिसून येतात. परंतु या वर्षी अशा रुग्णांची संख्या फार कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आजार होऊच नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.२० टक्के सर्दी, तापाचे रुग्णप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर म्हणाले, कोरोनाच्या भीतीने व शाळाही बंद असल्याने फार कमी लहान मुले घराबाहेर पडतात. यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी सर्दी, तापाचे रुग्ण कमी आहेत. सध्या याचे २० टक्के रुग्ण दिसून येत आहेत. काही पालक या लक्षणांची कोविडशी जुळवाजुळव करून पाहत असल्याचेही निदर्शनात आले आहे. कोविड रुग्णाशी किंवा बाहेरील व्यक्तीशी संपर्कात नसाल तर हा आजार होणार नाही, हे लक्षात घ्यायला हव,असेही ते म्हणाले. पावसात भिजू नका, पाणी उकळून प्या, स्वच्छता पाळाडॉ. बोधनकर म्हणाले, पावसात न भिजल्यास, दूषित अन्नाचे सेवन न केल्यास, पाणी उकळून, थंड करून प्यायल्यास व स्वच्छता राखल्यास या दिवसांतील ९० टक्के आजारांना दूर ठेवता येऊ शकते. सर्दी, तापाच्या रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. दोन वर्षाखालील या आजाराचे बाळ असेल तर त्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. दोन वर्षावरील बाळ असेल तर मास्क लावून ठेवा. डॉक्टरांकडे जाताना मास्क, सॅनिटायझेशन व स्वच्छतेचे कठोरतेने पालन करा.कोरोनाची लक्षणेताप, सर्दी, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, तोंडाची चव जाणे, अशक्तपणा आदी कोरोनाची लक्षणे आहेत.हे करा : पावसात भिजू नका:: बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा:: उकळून थंड केलेले पाणी पिण्यास वापरा:: आजारी व्यक्तीपासून दूर रहा:: सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी सहा फूट अंतर ठेवा:: गर्दी करू नका:: दैनंदिन जीवनात हस्तांदोलन, गळाभेट टाळा:: घरी पाहुणचार टाळा, इतरांच्या घरी जाणे टाळा:: आरोग्याची कुठलीही तक्रार भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या:: ६०वर्षांवरील ज्येष्ठांची काळजी घ्या.