लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील ‘जान’ नावाच्या ११ वर्षीय वाघिणीला दोन दिवसांपासून सर्दी झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तिची कोविड चाचणी काल करण्यात आली. त्याचा अहवाल गुरुवारी रात्री उशिरा मिळाला असून तो निगेटिव्ह आला आहे.
जानचे नाक दोन दिवसांपासून ओले दिसत होते. यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून बुधवारी कोविड चाचणीसाठी तिचे नमुने घेऊन तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आले होते. दिल्लीमधील प्राणिसंग्रहालयामध्ये असलेल्या दोन सिंहांना १५ दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभूमीवर सर्व प्राणिसंग्रहालयांना दक्षतेच्या सूचना प्राधिकरणाने दिल्या होत्या. जानला सर्दी झाल्याचे लक्षात आल्याने महाराजबाग प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाने तातडीने नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा संदेश गुरुवारी रात्री आल्याचे महाराजबाग प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावसकर यांनी सांगितले.
सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या जानला विलगीकरणात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. तिचे खाणे-पिणे व्यवस्थित असून हालचालीही नॉर्मल असल्याचे बावसकर यांनी सांगितले.