नागपूर: आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्याला दरवर्षीच्या तुलनेत थंड प्रतिसाद आहे. मंगळवारी सायंकाळ पर्यंत चार हजार ७८६ अर्ज दाखल झाले होते. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातून प्रवेश अर्ज भरण्यास थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. काही जिल्ह्यात बोटावर मोजण्या एवढे अर्ज भरले गेले आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवर ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया १६ एप्रिल रोजी सुरू झाली आहे. राज्यातील ७६ हजार ३६ शाळांमधील आठ लाख ८६ हजार १५९ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
त्यातील बहुतांश शाळा या शासकीय, अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच आहेत. नागपूर जिल्ह्यातील दोन हजार ६१९ शाळांत २२ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ३० एप्रिल पर्यंत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. परंतु आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळांतून प्रवेश मिळणार नसल्याने किती पालक प्रवेशास पसंती देतात, याबाबतचे चित्र पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे सरकारी शाळेत प्रवेशासाठी आरटीईचा घाट कशालापालकांना आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरत असताना केवळ सरकारी व अनुदानित शाळांची यादी समोर येत आहे. त्यामुळे पालकांची घोर निराशा झाली आहे. सरकारी शाळेत प्रवेश घ्यायचा मग आरटीईचा अर्ज कशाला करायचा? अर्ज न भरता सुद्धा शाळेत थेट प्रवेश मिळतोच ना? मग एवढा खटाटोप कशासाठी ? असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. आपल्या मुलाला सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी, या उद्देशाने पालक आजवर आरटीईतून प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते.