नागपूर : हिवाळ्याचा अर्धा अधिक ऋतू लाेटून गेल्यानंतरही हवा तसा थंडीचा अनुभव न घेतलेल्या नागपूरकरांना आता कुठे हुडहुडीची जाणीव व्हायला लागली आहे. आठवडाभर पावसाळी हवामानानंतर वातावरणाने कुस बदलली आणि पारा घसरायला लागला आहे. पावसाळी आर्द्रतेमुळे वातावरणातील गारठा वाढला असून कुलर, पंखा न लावता उबदार दुलई, ब्लँकेटचा आनंद आवडायला लागला आहे.
क्लायमेट चेंज समजत नसेल तरी ऋतूचक्र बदलते आहे, याची जाणीव आता सामान्य नागरिकांना व्हायला लागली आहे. हिवाळ्यात सलग थंडीचा अनुभव न हाेणे त्याचेच द्याेतक आहे. यावर्षीचा हिवाळा तिन्ही ऋतूचे मिश्रण असल्यासारखा वाटला. सप्टेंबरच्या शेवटपासून सुरू हाेणारी थंडी यावेळी डिसेंबरपर्यंतही जाणवली नाही. पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आणि उष्णता जाणवत राहिली. केवळ मधामधात २८ नाेव्हेंबर आणि १६ डिसेंबरला पारा १२.४ अंशावर गेल्याने थंडी आहे ही चाहूल जाणवली. त्यानंतर पारा १५ ते १९ अंशाच्या आसपास राहिला.
२० डिसेंबरला मात्र अचानक थंडीने कहर केला. तापमान थेट ७ अंशाने खाली घसरले. तापमान ७.८ अंश नाेंदविले गेले आणि नागपूरकरांना खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी जाणवली. २१ डिसेंबरला पुन्हा ७.६ अंशावर गेले. ताे पूर्ण आठवडा कडक हिवाळा जाणवला. मात्र त्यानंतर पुन्हा ढगांनी गर्दी केली आणि तापमान चढले. दिवसा स्वेटर, जॅकेटही घालण्याची गरज पडली नाही. ८ जानेवारीपासून पुन्हा आकाश ढगांनी व्यापले. कुठे जाेरात तर कुठे तुरळक पावसाने हजेरी लावली.
१४ जानेवारीची संक्रांतही सकाळी पावसाने धुतली; मात्र पावसाळी गार वाऱ्यांमुळे दिवसाचा पारा घसरला आणि थंडीचा जाेर वाढला. आता ढगांचे आच्छादन हटले आणि रात्रीचा पारा घसरायला लागला आहे. शनिवारी १५ अंशावर असलेले तापमान रविवारी २.४ अंश खाली आले व १२.४ अंश किमान तापमान नाेंदविले गेले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस तापमानात घसरण हाेण्याची शक्यता आहे.
यावर्षीचे सर्वात थंडे दिवस
तारीख तापमान
२८ नाेव्हेंबर १२.४ अंश
१६ डिसेंबर १२.४ अंश
२० डिसेंबर ७.८ अंश
२१ डिसेंबर ७.६ अंश
२२ डिसेंबर ८.५ अंश
२३ डिसेंबर ९.६ अंश
२४ डिसेंबर १०.९ अंश