नागपूर : डिसेंबरमध्ये रुसलेल्या थंडीने जानेवारीमध्ये कहर सुरू केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या पाऱ्याची घसरण कायम असून, विदर्भातील सहा जिल्हे थंड लाटेच्या विळख्यात आले आहेत. किमान तापमान १० अंशांच्या खाली आले असून, गाेंदिया व नागपुरात गारठ्याची तीव्रता अधिक आहे. सहा जिल्ह्यांत एक अंकी तापमान नाेंदविण्यात आले. टाॅप तीनमध्ये गाेंदिया ७.० अंश, नागपूर ८.५, यवतमाळ ८.५ या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.
साेमवारी गाेंदियाच्या तापमानात हलकी वाढ झाली; पण ७ अंशांवर कायम आहे. गेल्या दशकभरात पहिल्यांदा पारा ७ अंशांवर पाेहोचला आहे. दुसरीकडे नागपुरातही थंडीचा तडाखा तिसऱ्या दिवशीही कायम आहे. साेमवारी ०.५ अंशांची वाढ हाेऊन पारा ८.५ अंशांवर गेला; पण गारठा अतिशय तीव्रतेने जाणवू लागला आहे. गडचिराेलीतही पारा कालप्रमाणेच १० अंशांच्या खाली कायम आहे. मात्र, अमरावती, वर्धा, यवतमाळमध्येही २४ तासांत पारा घसरला. वर्धा, अमरावतीत किमान तापमान ९.९ अंश. सर्वाधिक सरासरी यवतमाळात घसरली. येथे ८.५ अंश तापमानाची नाेंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा ६.४ अंशांनी कमी आहे.
याशिवाय चंद्रपूर, बुलढाणा १० अंश, अकाेला व ब्रह्मपुरीत १०.४ अंश किमान तापमान नाेंदविण्यात आले. विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा अधिक असले तरी वाहत्या थंड वाऱ्यामुळे गारवा जाणवताे. आकाश पूर्णपणे स्वच्छ व निरभ्र आहे. येत्या १५ जानेवारी म्हणजे संक्रांतीपर्यंत थंडीचा हा जाेर असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मेळघाट गारठलेलाच; चिखलदरा @ ९
चिखलदरा, मेळघाट परिसरात थंड लाटेमुळे रविवारी पानांवरील दवबिंदू गाेठल्याचे चित्र दिसून आले. ही स्थिती आजही कायम आहे. चिखलदरा पर्यटनस्थळावर पाऱ्याची ९ अंश सेल्सिअसची नोंद सोमवारी पहाटे ३ ते ७ वाजेपर्यंत नोंदविली गेली. मागील सहा दिवसांपासून मेळघाट गारठलेलाच आहे. सोमवारीसुद्धा ९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले होते. त्यामुळे गरम कपडे शेकोट्या पेटलेल्याच होत्या.
विदर्भातील किमान तापमान
गाेंदिया ७.०
नागपूर ८.५
यवतमाळ ८.५
गडचिराेली ९.६
अमरावती ९.९
वर्धा ९.९
अकाेला १०.४
बुलढाणा १०.०
चंद्रपूर १०.०
वाशिम ११.८