नागपूर :हवामान अंदाजानुसार विदर्भात किमान तापमानाची घसरण दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. थंडीने विदर्भाला गारेगार केले. काही शहरांत किमान तापमान १० अंशांच्या खाली आले आहे. गाेंदियात ६.८ अंश आणि नागपुरात ८ अंश किमान तापमान नाेंदले गेले, जाे या हिवाळ्यातील सर्वांत थंड दिवस ठरला. अचानक तापमान घसरले आणि हुडहुडीने दाेन्ही शहरांतील लाेकांची दातखिळी बसली.
हिमालयाच्या क्षेत्रात पश्चिमी झंझावातामुळे पाऊस आणि बर्फवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून, त्या प्रभावाने मध्य प्रदेश व विदर्भही गारठला आहे. मागील ४८ तासांत विदर्भात रात्रीचा पारा अचानक खाली काेसळला. गाेंदियात सरासरीपेक्षा तापमान ५.८ अंशांनी खाली आले व ६.८ अंशांची नाेंद झाली. गेल्या दशकभरात हा सर्वांत थंड दिवस ठरला आहे.
नागपुरात पारा २४ तासांत पुन्हा १.९ अंशांनी खाली घसरला व ८ अंशांची नाेंद करण्यात आली. तापमान सरासरीपेक्षा ४.९ अंशांनी घटले आहे. याशिवाय वर्धा व गडचिराेली ९.४ अंश व ब्रह्मपुरीत ९.६ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. अकाेला, अमरावती, यवतमाळ, बुलढाण्यात पारा २४ तासांत ३ ते ५ अंशांनी खाली आला. चंद्रपूरमध्ये १०.२, अमरावती १०.४ आणि यवतमाळात १०.७ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. रात्रीचे तापमान सर्वत्र खाली घसरले; पण दिवसाचे तापमान पूर्व विदर्भात सरासरीखाली आणि पश्चिम विदर्भात सरासरीच्या वर आहे. कमाल तापमान सरासरीएवढे असले तरी दिवसाही वातावरणात गारवा जाणवत आहे.
तापमानाची ही घसरण पुढचे दाेन दिवस राहणार आणि विदर्भवासीयांना थंडीच्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पहिल्यांदा पारा आला ८ अंशांवर
या हिवाळ्यात नागपूरकरांना पहिल्यांदा थंडीच्या लाटेचा सामना करावा लागताे आहे. रविवारी रात्रीचा पारा ४.९ अंशांनी खाली घसरून ८ अंशावर पाेहोचला. हा या सिजनचा सर्वाधिक थंड दिवस आहे. यापूर्वी ९ डिसेंबर व ७ जानेवारीला किमान तापमान ९.९ अंशावर गेले हाेते. सकाळी उन निघत असले तरी सूर्य मावळताच हुडहुडी भरते. शहरवासी थंडीच्या लाटेत गारठले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आकाशातून ढग हटल्यानंतर वातावरण काेरडे झाले. काेरडेपणा वाढताच पाऱ्यात वेगाने घसरण झाली. नागपुरात सायंकाळी आर्द्रतेचे प्रमाण ३५ टक्के हाेते. गार वाऱ्यामुळे आणखी गारठा भरला आहे. नागपुरात रविवारी सकाळी चांगले ऊन पडले हाेते व साेबत गार वारे वाहत हाेते. त्यामुळे सायंकाळ हाेताच, लाेकांना थंडी सतावू लागली. दिवसाचे तापमान १.७ अंशाने वाढून २८.३ अंश नाेंदविण्यात आले. हे तापमान सरासरीएवढे असूनही गारवा कायम हाेता. सूर्यास्तानंतर तर तापमान वेगाने खाली घसरले. त्यामुळे लाेकांना गाेठल्यासारखे वाटायला लागले आहे.
जानेवारीत थंडी सतावणार
१९९६ साली ७ जानेवारी राेजी नागपूरचे किमान तापमान ३.९ अंश नाेंदविण्यात आले हाेते, जे जानेवारी महिन्यात नाेंदविलेले आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान हाेय. डिसेंबर महिन्यात थंडीऐवजी उष्णता जाणवली. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये थंडी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
दशकातील सर्वात कमी तापमान (अंशामध्ये)
- ९ जानेवारी २०१३ - ५.६
- २९ जानेवारी २०१४ - ९.५
- १० जानेवारी २०१५ - ५.३
- २३ जानेवारी २०१६ - ५.१
- १३ जानेवारी २०१७ - ७.२
- २७ जानेवारी २०१८ - ८
- ३० जानेवारी २०१९ - ४.६
- ११ जानेवारी २०२० - ५.७
- ३१ जानेवारी २०२१ - १०.३
- २९ जानेवारी २०२२ - ७.६
थंडीचा कडाका
औरंगाबाद ९.४, उस्मानाबाद १०.१, अकोला ११, जळगाव ११, बुलढाणा ११.५, उदगीर ११.६, परभणी १२, नांदेड १२.२, महाबळेश्वर १२.२, नाशिक १३, बारामती १३.२, पुणे १३.४, जालना १३.६, सातारा १४.३, सोलापूर १४.८, मालेगाव १४.८, माथेरान १६, सांगली १६.२, कोल्हापूर १७.२, मुंबई २१.२