नागपूर : ‘काॅलरवाली’ म्हणून लाेकप्रिय असलेली पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिवनी (मध्य प्रदेश) जंगलातील टी-१५ वाघिणीचे निधन झाले. वयाच्या साडे १६ व्या वर्षी कर्माझरीच्या काेर वनक्षेत्रातील बुढादत्त नाला, रय्यकसा कॅम्पअंतर्गत कुंभादेव कक्ष परिसरात, शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान ती मृतावस्थेत आढळली. तशी ती वृद्धावस्थेत पाेहोचली हाेती. मात्र, स्वत:चे शरीर चाटण्याच्या सवयीमुळे पाेटात गेलेल्या केसांचा गाेळा जमा झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील आठवड्यापासून टी-१५ वाघिणीवर देखरेख ठेवणे सुरू हाेते. मात्र, शनिवारी जंगलात तिची हालचाल दिसून न आल्याने वनविभागाच्या पथकाने शाेध सुरू केला. तेव्हा घटनास्थळी ती मृतावस्थेत आढळली. रविवारी सकाळी मध्य प्रदेश वनविभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुब्रमण्यम सेन, पेंच (मप्र)चे क्षेत्र संचालक अशोक मिश्रा, उपसंचालक अधर गुप्ता, एसीएफ बी.पी. तिवारी, आरएफओ आशिष खोब्रागडे, एनटीसीए प्रतिनिधी विक्रांत जठार व वेटरनरी डॉ.अखिलेश मिश्रा आणि फॉरेंसिक एक्स्पर्ट डॉ.अमोल रोकड़े यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले.
कॉलरवाल्या वाघिणीचा जन्म पेंचच्या सिवनी क्षेत्रात सप्टेंबर, २००५ साली झाला. त्यानंतर, तिची आई टी-७ वाघिणीचा मृत्यू झाला. वयस्क झाल्यावर टी-१५ वाघिणीने आईचा वारसा सांभाळला. ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून लाेकप्रिय झाली.
...म्हणून ‘काॅलरवाली’ नावाने प्रसिद्ध
२००८ साली तिच्या देखरेखीसाठी देहरादूनच्या वाइल्ड लाइफ तज्ज्ञांनी तिला रेडियो कॉलर लावला हाेता. त्यामुळे ती ‘काॅलरवाली वाघीण’ म्हणून प्रसिद्ध झाली. सध्या या वनक्षेत्रात लाेकप्रिय असलेली पाटदेवची टी-४ वाघीण ही काॅलरवाली वाघिणीची मुलगी आहे. ही वाघीण आता तिच्या पाच शावकांसह दिसून येते.
२९ शावकांना दिला जन्म
मध्य प्रदेशचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुब्रमण्यम सेन यांनी सांगितले, ही वाघीण मे, २००८ ते २०१८ पर्यंत आठ वेळा गराेदर राहिली आणि २९ शावकांना जन्म दिला. काॅलरवालीने मे, २००८ साली पहिल्यांदा तीन शावकांना जन्म दिला हाेता. यानंतर ऑक्टाेबर, २००८ मध्ये चार शावक, ऑक्टाेबर, २०१० साली पाच शावक, मे, २०१२ साली तीन शावक, ऑक्टाेबर, २०१३ मध्ये तीन शावक, एप्रिल, २०१५ मध्ये चार शावक, २०१७ साली तीन आणि डिसेंबर, २०१८ मध्ये चार शावकांना तिने जन्माला घातले.
शावक जन्माचा विक्रम तिच्या नावे
एका वेळी पाच शावकांना जन्म देण्याचा विक्रम काॅलरवाली वाघिणीच्या नावे आहे, शिवाय सर्वाधिक शावकांना जन्म देण्याचा विक्रमही तिच्या नावावर आहे. यापूर्वी राजस्थानच्या रणथंबाेर व्याघ्र प्रकल्पातील जगप्रसिद्ध ‘मछली’ वाघिणीच्या नावावर २३ शावकांना जन्म देण्याचा विक्रम हाेता. काॅलरवालीने २९ शावकांना जन्म देऊन मछलीचा विक्रम माेडला.