निशांत वानखेडे
नागपूर : कॉटन मार्केट चौकातून चोर बाजाराकडे वळले की त्या कॉर्नरवर तुम्हाला दाढी पिकलेला एक म्हातारा नाणी आणि नोटा विकताना दिसेल. ही नाणी आता चलनबाह्य झाली पण कधीकाळी तुमच्या खिशात खेळत आणि इच्छापूर्ती करीत होते. ५ पैसे, १० पैसे, २० पैसे, २५ पैसे, ५० पैसे आणि बरेच असे शिक्के, जे कालबाह्य झाले पण आज तेच वारसा आहेत. स्वातंत्र्यापासून चलनातून बाद झालेले आणि त्याहीपलीकडे ३०० वर्षापर्यंतच्या नाणी, टोकण या फूटपाथवरच्या दुकानात तुम्हाला मिळतील.
ही दाढी पिकलेली व्यक्ती म्हणजे इब्राहिम खान. आता त्यांचे वय ७७ वर्षे आहे. खरेतर हे त्यांचे दुकान नाही तर प्रदर्शन आहे, असे ते मानतात, कारण ताे त्यांनी गेल्या ४० वर्षापासून सांभाळला आहे. तरुण असताना भंगार गाेळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे आणि तेव्हापासूनच त्यांना असे पुरातन साहित्य गाेळा करण्याचा छंद लागला. कुणी घरातील तांब्या, पितळेचे भांडे, ॲन्टिक साहित्य विकायचे. इब्राहिम खान ते विकत नसत तर घरी संग्रहात ठेवत असत. पुढे त्यांना असे पुरातन साहित्य, नाणी, नाेटा यांचा संग्रह करण्याचे वेडच लागले. अशा चलनबाह्य नाणी, नाेटा त्यांनी काेणत्याकाेणत्या शहरातून आणल्या, हे आता त्यांनाही आठवत नाही. मात्र भारतात जिथे जिथे फिरलाे, तिथून ते गाेळा केल्याचे ते सांगतात. आता त्यांच्या संग्रहात काही मुघलकालीन, शिवकालीन शिक्के, मुद्रा आणि पूजेत वापरत असलेले वेगवेगळ्या देवीदेवतांचे टाेकन उपलब्ध आहे.
अनेक ठिकाणी हाेणाऱ्या नाणी, नाेटांच्या प्रदर्शनात त्यांच्या संग्रहाचा समावेश असताे. ते १९१० साली बनारसमध्ये स्थापन झालेल्या इतिहासकालीन वस्तू संग्राहक साेसायटीचे सदस्य आहेत. या वस्तू विकल्या जात नाहीत तर छंदवेडे लाेक त्या घेऊन जातात व संग्रही ठेवतात. ही नाणी आता कालबाह्य झाली पण काळाच्या ओघात देशाचा वारसा म्हणून त्यांचे स्थान राहील, अशी भावना इब्राहिम व्यक्त करतात.